(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Chilika India : भारतातील अजब सरोवर, उन्हाळ्यात खारं तर पावसाळ्यात असतं गोड पाणी
Odisha Chilika India : ओडिशामधील चिल्का या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते. जगभरातील पर्यटक हा सरोवर पाहण्यासाठी येत असतात. चिल्का सरोवर कोलकाता आणि मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून 89 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
Odisha Chilika India : भारतात आणि जगात अनेक ठिकाणी सरोवरे आहेत. यातीलच ओडिशा राज्यात चिल्का हे अतिशय मोठे सरोवर आहे. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसरे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराचे खास आकर्षण म्हणजे या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते. जगभरातील पर्यटक हा सरोवर पाहण्यासाठी येत असतात.
चिल्का सरोवर कोलकाता आणि मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून 89 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. येथील वनसंपदा प्रेक्षणीय असून मासेमारीसाठी आणि पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे. खास बाब म्हणजे सागरी जीवविज्ञान आणि मत्स्यसंवर्धन यांच्या अभ्यासाच्या केंद्रांसह विश्रामगृहे देखील येथे उघडण्यात आली आहेत. या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. या दोन बेटांशिवाय येथे अनेक निर्जन बेटे देखील आहेत. या सुंदर बेटांवर भातशेती होते. यातील काही बेटांवर लोकवस्ती देखील आहे. तसेच सोलारी, भालेरी आणि जतिया या लहान टेकड्या देखील आहेत. या ठिकाणी येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. चिल्का सरोवरात खूप ठिकाणी मासेमारी चालते.
चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी देखील चिल्हा सरोवर प्रसिद्ध आहे. चिल्का या सरोवरात विविध प्रकारच्या वनस्पती असून अनेक प्रजातींची जनावरे देखील येथे आहेत. जैववैविध्याने नटलेल्या या सरोवरात बोटसफर आणि बेटभ्रमंतीला पर्यटक खास पसंती देतात. चिल्का सरोवरात दोन प्रकारचे डॉल्फीन आहेत. चिल्का सरोवरातील पर्यटनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरोवरातील बेटं आहेत.
हे सरोवर सत्तर किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंद आहे. तर 16 ते 32 किमी रूंद आहे. याची खोली फक्त एक ते दीड मीटर असते. यामुळे येथे बुडून होणाऱ्या दुर्घटना घडत नाहीत. बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे. चिल्का हे ओडिशामधील पुरी आणि गंजाम या दोन जिल्हांमध्ये पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात 1,165 चौ. किमी आणि उन्हाळ्यात 891 चौ. किमी. असतो.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील अलीकडेच चिल्का सरोवर म्हणजे ओडिशाची संस्कृती असल्याचे सांगत तेथील काही फोटो ट्विट केले आहेत. "चिल्का सरोवर हे ओडिशाच्या संस्कृती आणि साहित्याचा अविभाज्य भाग आहे. हे निसर्गप्रेमींचे नंदनवन आहे. या हिवाळ्यात आपण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवूया. असे ट्विट नवीन पटनायक यांनी केले आहे."
#ChilikaLake has been integral to #Odisha’s culture & literature. It is a nature lovers’ paradise and host to fascinating carnival of avian guests. This winter let’s spend time with the symphony of nature where life is nurtured & nature celebrates its glory. #IndiasBestKeptSecret pic.twitter.com/FnvTFm9Bvh
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) October 23, 2022
संबंधित बातम्या