'महावीर चक्र'नं संतुष्ट नाही; गलवान संघर्षातील शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या वडिलांकडून नाराजीचा सूर
कर्नल संतोष बाबू यांना त्यांच्या धाडसी कामगिरीसाठी मरणोत्तर महावीर चक्र या बहुमानानं सन्मानित करण्यात आलं. पण, आपल्या मुलाला मिळालेल्या या बहुमानावर कर्नल संतोष यांच्या वडिलांनी मात्र नाराजीचा सूर आळवला आहे.
नवी दिल्ली : भारत विरुद्ध चीन (India China) असे खटके अनेकदा उडत असतात. पण, मागील वर्षी म्हणजेच 2020 मधील जून महिन्यात पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याशी भारतीय सैन्याचा हिंसक संघर्ष झाला. यामध्ये भारतीय लष्करातील कर्नल संतोष बाबू शहीद झाले. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमध्ये देशाप्रती आपले प्राण त्यागणाऱ्या कर्नल संतोष बाबू यांना त्यांच्या धाडसी कामगिरीसाठी मरणोत्तर महावीर चक्र या बहुमानानं सन्मानित करण्यात आलं. पण, आपल्या मुलाला मिळालेल्या या बहुमानावर कर्नल संतोष यांच्या वडिलांनी मात्र नाराजीचा सूर आळवला आहे.
चीनच्या सैन्यापुढं दाखवलेल्या शौर्यासाठी कर्नल संतोष बाबू यांना परमवीर चक्रनं गौरवलं जाणं अपेक्षित होतं, अशीच प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी दिली. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बाबू यांचे वडील पी. उपेंद्र यांनी ही प्रतिक्रिया दिली.
'मला या बहुमानानं आनंद मिळाला नाही असं नाही, पण मी यासाठी (महावीर चक्रसाठी) पूर्णपणे संतुष्टही नाही. त्यांचा आणखी चांगल्या मार्गानं सन्मान करता आला असता. असामान्य साहसी कामगिरीसाठी माझ्या मते संतोष बाबू यांना सर्वोच्च सैन्य पुरस्कार परमवीर चक्रनं गौरवण्यात येणं अपेक्षित होतं', असं ते म्हणाले. भारताच्या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
चीन आणि भारतीय सैन्यामध्ये 15 जून 2020ला पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला. भारत- चीन सीमावादाच्या मुद्द्यावरुन ही संघर्षाची ठिणगी पडली होती. त्यावेळी भारतीय भूखंडावर घुसखोरी करणाऱ्या चीनी सैन्यापुढं भारतीय सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली लढा दिल्याची माहिती समोर आली होती. या संघर्षामध्ये भारतीय सैन्यातील 20 जवानांना वीरमरण आलं होतं. 16 बिहार रेजिमेंटमधील कर्नल संतोष बाबू हेसुद्धा याच 20 शहिदांपैकी एक होते, ज्यांनी देशासाठी प्राणाहूती दिली होती.