No Confidence Motion : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा; आतापर्यंत काय घडलं?
No Trust Vote Debate : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली आहे.
No Confidence Motion : मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या एकजुटीची चाचपणीदेखील याद्वारे होणार आहे. संख्याबळानुसार केंद्र सरकारला सध्या तरी कोणताही धोका नाही. आज अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसचे खासदार तरुण गोगई यांनी सुरुवात केली. आतापर्यंत नेमकं काय झालं..
राहुल गांधी नव्हे गौरव गोगोई यांनी केलं पहिलं भाषण
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, 'पंतप्रधानांना हे मान्य करावे लागेल की त्यांचं डबल इंजिन सरकार, मणिपूरमधील त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 5000 घरे जाळली गेली, सुमारे 60,000 लोक मदत शिबिरात आहेत आणि सुमारे 6500 एफआयआर नोंदवले गेले आहेत. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवादाचे, शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे होते, त्यांनी चिथावणीखोर पावलं उचलल्याने समाजात तणाव निर्माण झाला असल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, "पंतप्रधान मोदी केवळ मणिपूरवरच नव्हे तर अदानी मुद्द्यावरही मौन बाळगून आहेत. चीनबाबतही मौन सोडलं नाही. पंतप्रधान मोदी त्यांची चूक मान्य करत नाहीत असे गोगोई यांनी म्हटले. अदानींच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजप खासदारांनी गोंधळ घातला.
मणिपूरमधील हिंसा सरकार पुरस्कृत; समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा हल्लाबोल
समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. महिलांवरील अत्याचाराबाबत चर्चा होत असताना उत्तर प्रदेशचीही चर्चा व्हायलाच हवी. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये दर तीन तासाला एका महिलेवर शारीरिक अत्याचार होत आहेत. डबल इंजिन सरकार याची दखल घेत नसल्याची टीका त्यांनी केली. मणिपूरची घटना ही किरकोळ घटना नाही. ही अतिशय संवेदनशील घटना आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे. मणिपूरमधील घटनेचा जगभरातून निषेध होत आहे. भारतातील लोकांचे डोके शरमेने झुकले आहे. हे राज्य पुरस्कृत हिंसाचार असल्याचे त्यांनी म्हटले. मणिपूर सरकारने ठरवलं असतं तर हिंसाचार तर दोन दिवसांत तो आटोक्यात आणता आला असता. मात्र सरकारचा हेतू योग्य नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण जगाला आपले कुटुंब म्हणतात. मणिपूर हे आमचे कुटुंब नाही का? मग मणिपूरला सावत्र आईची वागणूक का दिली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपने 9 वर्षात 9 सरकारं पाडली; सुप्रिया सुळेंचा घणाघात
लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं मोठं अपयश असल्याची टीका करत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
संसद टीव्हीच्या चॅनलखाली चालणाऱ्या मजकुरावर विरोधकांचा आक्षेप, दुबेंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ
भाजपकडून संसदेत निशिकांत दुबे जेव्हा पहिल्यांदा बोलण्यास उभे राहिले तेव्हा विरोधाकांनी गोंधळ केला. कारण संसद टीव्हीत अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू असताना खाली सरकारच्या आजवरच्या कामगिरीचे टिकर चालत होते. त्याबद्दल विरोधकांनी आक्षेप नोंदवला, जोपर्यंत ते टिकर हटवले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज बंद राहील अशी भूमिका विरोधकांनी घेतली. मणिपूरच्या हिंसाचारावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना मागील 9 वर्षात भाजपने निवडून आलेली 9 सरकारे पाडली असल्याचे म्हटले.
लोकसभेतल्या अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत महाराष्ट्रातल्या राजकीय संघर्षाचं प्रतिबिंब
शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या कारभाराचे वाभाडे यानिमित्तानं सभागृहात काढले. मुख्यमंत्री यांनी घरी बसून काम करण्याचा एक रेकॉर्डच केला अशी टीका त्यांनी केली. तर खासदार अरविंद सावंत यांनी नंतर पळपुट्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका तर करत त्याला प्रत्युत्तर दिलं. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या राजकारणावरुन बोलत असताना समोरच्या बाकावरुन त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं चँलेज आलं, त्यावर त्यांनी सभागृहातच हनुमान चालिसा ऐकवली. शिंदे ठाकरे गटाच्या या जुगलबंदीत नंतर भर पडली ती नारायण राणे यांच्या भाषणानं. राज्यसभेचे सदस्य असले तरी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना या भाषणात बहुदा या प्रत्युत्तरासाठीच छोटीशी संधी दिली होती. भाषणं ऐकून महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्यासारखं वाटतंय असं म्हणत नंतर त्यांनी शिवसेना, ठाकरे या विषयावरच तोफ डागली.
काँग्रेसने रणनीती बदलली
आजच्या अविश्वास ठरावाचे पहिले भाषण राहुल गांधी करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, राहुल गांधी यांनी भाषण केले नाही. राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत काँग्रेसकडून अचानक रणनीतीमध्ये बदल करण्यात आला. पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसल्याने राहुल गांधी यांनी पहिलं भाषण केलं नाही. ज्या दिवशी मोदी सभागृहात त्याच दिवशी राहुल गांधी भाषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संख्याबळ नसतानादेखील विरोधकांकडून अविश्वास ठराव का?
एनडीएकडे 332 चं संख्याबळ आहे. सरकारला धोका तर नाहीय, पण तरी सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरं जावं लागणार आहे. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्यानं या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली आहे. मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरु होता. विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही होते. अविश्वास प्रस्तावावर उत्तर पंतप्रधानांनाच द्यावं लागतं, त्यामुळे यानिमित्तानं पंतप्रधानांनाच उत्तर देण्यास भाग पाडण्याची रणनीती आखली गेली आहे.