एक्स्प्लोर
नितीश कुमार मुख्यमंत्री, सुशील मोदी उपमुख्यमंत्री
जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
पाटणा: जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
नितीश कुमार यांच्यानंतर भाजप नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी भाजपच्या साथीने बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयू आणि भाजपचे 13 -13 मंत्री असतील.
बिहारमध्ये रात्रभर घडामोडी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा दिल्यानंतर रात्रभर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळही बदलण्यात आली. सुरुवातीला शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पाच वाजता होणार होता. मात्र, त्याची वेळ बदलून आज सकाळी 10 वाजता करण्यात आली.
भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानं लालूप्रसाद यादव यांचे चिंरजीव तेजस्वी यादव यांनी थेट रात्री अडीच वाजता राजभवनावर अनेक कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला. राजद बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असून राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला बोलवावं अशी मागणी तेजस्वी यादव यांनी यावेळी केली. दरम्यान, राज्यपालांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत रात्री चर्चाही केली.
लालू न्यायालयात जाणार?
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राजद याप्रकरणी न्यायालयातही जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात जेडीयूच्या अडचणी वाढू शकतात. मात्र, असं असलं तरी राजकीयदृष्ट्या बहुमत सिद्ध करताना जेडीयूला कोणतीही अडचण येणार नाही.
नितीश कुमार यांचा राजीनामा
“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.
जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
नितीश कुमार राजीनाम्याची माहिती देत असताना मोदींचं ट्वीट
नितीश कुमार राज्यपालांकडे राजीनामा देऊन बाहेर आले. माध्यमांना राजीनामा का दिला, याची माहिती देत असतानाच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या.
मोदी काय म्हणाले?
भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज आहे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
नितीश कुमारांकडून मोदींचे आभार
एकीकडे मोदींनी नितीश कुमार यांचे आभार मानल्याची चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं. राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल मी मोदींना मनापासून धन्यवाद देतो, असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं.
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव
नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.
लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला.
बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement