एक्स्प्लोर
देशातील रस्ते अपघातांवर गडकरी नाराज, मात्र मुंबईच्या ट्रॅफिकचं कौतुक
पाच वर्षात रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने कमी करण्याची घोषणा करणारे नितीन गडकरी याबाबत समाधानकारक प्रगती होत नसल्याने नाराज आहेत.
नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघातांवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु रस्ते वाहतुकीत मुंबईच्या शिस्तीचं गडकरींनी कौतुक केलं आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई देशात पहिल्या नंबरवर असली तरी रस्ते अपघातातल्या मृत्यूंचं प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. दिल्ली, चेन्नईत सर्वाधिक अपघात होतात. त्यावर विचारलं असता गडकरींच्या खात्यातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईच्या रस्ते वाहतुकीतल्या शिस्तीचं दिलखुलास कौतुक केलं, ज्याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनुमोदन दिलं.
दिल्लीत लेनची शिस्त अजिबात पाळली जात नाही, त्या तुलनेत मुंबईतले ड्रायव्हर्स हे लेन शिस्तीबाबत चांगले आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं. महाराष्ट्र रस्ते अपघातात तिसऱ्या नंबरवर असला तरी अपघाताचं प्रमाण वेगाने कमी करणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश होतो हे विशेष.
दरम्यान, पाच वर्षात रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने कमी करण्याची घोषणा करणारे नितीन गडकरी याबाबत समाधानकारक प्रगती होत नसल्याने नाराज आहेत. 2016 या वर्षासाठी रस्ते अपघाताचा अहवाल गडकरींनी सादर केला, त्यातले आकडे धक्कादायक आहेत.
एका वर्षात 4 लाख 80 हजार 652 अपघात झाले असून त्यात 1 लाख 50 हजार 785 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणजे भारतात एका तासाला 55 अपघात म्हणजे जवळपास मिनिटाला एक अपघात होतो, ज्यात तासाला 17 जण मृत्यूमुखी पडत आहेत.
2015 च्या तुलनेत 2016 मध्ये अपघातांचं प्रमाण 4.1 टक्क्यांनी कमी झालेलं आहे, मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3.2 टक्क्यांनी वाढलेली आहे. हे आकडे समाधानकारक नसल्याची कबुली खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली.
रस्ते अपघातातल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेतली तर देशात उत्तर प्रदेशचा पहिला, तामिळनाडूचा दुसरा तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. अर्थात शहरनिहाय संख्या पाहिली तर राजधानी दिल्ली हे पहिल्या, चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दुचाकीच्या अपघातात वर्षभरात जे 52,500 मृत्यू झाले आहेत त्यापैकी 10135 मृत्यू केवळ हेल्मेट न घातल्यामुळे झाले.
शिवाय गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्याने वर्षभरात 2138 लोकांना जीव गमवावा लागला. या मानवी चुकांसह रस्त्यांचं चुकीचं डिझाईन, ज्यात कधी बायपास, योग्य ठिकाणी रस्ते ओलांडण्याची सुविधा नसणं या गोष्टींचाही समावेश असल्याची कबुली गडकरींनी दिली.
पूर्वीच्या काळी रस्ते स्वस्तात बांधण्यावर भर असल्याने अशा चुका झाल्याचं गडकरींनी म्हटलं. मात्र याबाबत कुणाला दोष देत न बसता, लोकांनी व माध्यमांनी अशा चुका समोर आणल्यास त्याबाबत आपलं खातं तात्काळ कारवाई करेल, असंही आश्वासन त्यांनी दिलं.
रस्ते अपघाताचे अहवाल राज्यांनाही वर्षाला सादर करावेत, जेणेकरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल असंही गडकरींनी म्हटलं आहे. मोटार वाहन कायद्यात वाहतुकीची शिस्त न पाळल्यास मोठ्या दंडाची तरतूद असल्याने हे विधेयक तातडीने मंजूर झाल्यासही रस्ते वाहतुकीतल्या अपघातांची संख्या कमी होईल असा दावा गडकरींनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement