एक्स्प्लोर
गोरखपूर दुर्घटना : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची यूपी सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवली असून, ही घटना म्हणजे आरोग्य विभागाची निर्दयता असल्याचे ताशेरेही ओढले आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकर आयोगानेही (NHRC) दखल घेतली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवली असून, ही घटना म्हणजे आरोग्य विभागाची निर्दयता असल्याचे ताशेरेही ओढले आहेत. गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडलेल्या 60 हून अधिक मुलांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी काय पावलं उचलली आणि दोषी अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली, याचं उत्तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना विचारलं आहे. येत्या चार आठवड्यात सविस्तर अहवाल देण्याचे आदेशही दिले आहेत. गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये सात ऑगस्टपासून आतापर्यंत 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. माध्यमांमधील बातम्या गांभिर्याने घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुमोटो दाखल करत नोटीस पाठवली. कुठल्याही रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येत मुलांचे मृत्यू होणं म्हणजे राईट टू लाईफ अँड हेल्थचं उल्लंघन आहे. शिवाय, ही घटना म्हणजे रुग्णालय प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारमधील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाची निर्दयताच दाखवून देते, असेही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटलं आहे.
आणखी वाचा























