Skylab Crash : जमिनी विकल्या, पैसा खर्च केला...जेव्हा अमेरिकन 'स्कायलॅब'मुळे अंताच्या भीतीने भारतीयांची त्रेधातिरपीट उडाली होती
अमेरिकेचे स्कायलॅब स्पेस स्टेशन (US Skylab space station) 12 जुलै 1979 या दिवशी पृथ्वीवर आदळणार होतं. त्यावेळी संपूर्ण भारतात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता. स्कायलॅबमुळे जो थरार 1979 मध्ये जगभराने अनुभवला होता तोच थरार आताच्या पीढीला पुन्हा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B या आठवड्यात कोणत्याही क्षणी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. पण ते नेमकं कोणत्या ठिकाणी आदळणार याची निश्चिती नाही. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. असंच किंबहुना यापेक्षा जास्त भीतीचे वातावरण 1979 साली निर्माण झालं होतं. कित्येक भारतीयांना तर आपला अंत जवळ आल्याची जाणीव झाली होती.
चीनच्या हे अनियंत्रित रॉकेट अनेकांना 1979 सालच्या स्कायलॅब या अमेरिकन स्पेस स्टेशनच्या अपघाताची आठवण करुन देतंय. स्कायलॅब हे जगात कुठेही आदळण्याची शक्यता होती, त्यामुळे संपूर्ण जग काळजीत पडलं होतं.
पृथ्वीवर दोन तृतीयांश पाणी आहे आणि एका मोठ्या भागावर लोकांची वस्ती नाही. त्यामुळे अमेरिकेचे हे स्पेस स्टेशन मानवी वस्तीमध्ये आदळण्याची शक्यता कमी होती. पण ते मानवी वस्तीमध्ये आदळणारच नाही असं मात्र शंभर टक्के सांगता येत नव्हतं.
अमेरिकेच्या नासाने स्कायलॅब नावाचे एक स्पेस स्टेशन आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी अवकाशात उभं केलं होतं. स्कायलॅब हे जवळपास नऊ मजली उंच आणि 78 टनाचे स्टेशन अमेरिकेने 1973 साली अवकाशात उभारलं होतं. 1978 पर्यंत स्कायलॅब व्यवस्थित काम करत होतं पण नंतर सौर वादळामुळे त्याचे नुकसान झालं आणि त्यामध्ये बिघाड झाला. याचा परिणाम म्हणजे नासाचे त्यावरचं नियंत्रण सुटल्याची माहिती आली. त्यामुळे हे स्पेस स्टेशन जर पृथ्वीवर आदळलं तर संपूर्ण मानवजातीचा नाश होऊ शकतो अशा बातम्या येऊ लागल्या.
स्कायलॅब भारतावरच पडणार अशी भावना
स्कायलॅब जर भारत किंवा अमेरिकेवर पडणार असेल तर निश्चितपणे अमेरिका ते आपल्या जमिनीवर पडू देणार नाही, ते भारतावरच पाडण्यात येईल असं बोललं जायचं. अमेरिकेचे भारतातील विशेष दूत थॉमस रेबालोविच यांनी स्कायलॅब अमेरिकेत पाडण्यात येईल असं सांगितलं पण या बातमीचा भारतीयांवर वेगळाच परिणाम झाला.
अनेकांनी आपल्या संपत्ती विकल्या
स्कायलॅब जमिनीवर पडणार हे आता निश्चित होतं. पण जसजशी त्याची तारीख जवळ येऊ लागली तसतसे भारतीयांमध्ये भीती वाढू लागली. आता काहीच दिवसात जगाचा नाश होणार हीच भावना ग्रामीण भारतात वाढू लागली. त्यावेळी अनेकांनी आपल्या जमीनी विकल्या आणि खर्च करायला सुरु केलं. कारण आपणच राहिलो नाही तर संपत्तीचं काय करायचं असा प्रश्न होता.
भारतात हाय अलर्ट जारी
12 जुलै 1979 या दिवशी स्कायलॅब पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार होतं. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण भारतभर हाय अलर्ट जारी केला होता. तोपर्यंत भारतीय लोक मृत्यूच्या प्रचंड मोठ्या दहशतीखाली होते. शेवटच्या क्षणी नासाने सांगितलं की स्कायलॅब हे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हिंदी महासागरात कोसळेल. या स्पेस स्टेशनचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमी भागात पडले पण कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या घटनेनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ऑस्ट्रेलियाची माफी मागितली. ऑस्ट्रेलियाच्या एका स्थानिक संस्थेने अमेरिकेवर या प्रकरणी 400 डालरचा दावा ठोकला होता पण अमेरिकेने शेवटपर्यंत ही रक्कम चुकती केली नाही.
स्कायलॅबच्या या घटेनेनंतर आता अंतराळ क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे पण अजूनही एखादे नियंत्रणाबाहेर गेलेलं रॉकेट नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या क्षणी पडणार हे सांगता येत नाही.
चीनचेही एक अनियंत्रित रॉकेट आता पृथ्वीवर आदळणार आहे. या निमित्ताने 1979 साली जो थरार भारतीयांनी आणि जगाने अनुभवला, तोच थरार आता या पीढीला अनुभवायला मिळणार आहे हे नक्की.
महत्वाच्या बातम्या :