पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल
Narendra Modi AI Video Delhi Police FIR : बिहार काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई यांच्यासंबंधी एक AI व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांची दिवंगत आई हीराबेन (Heeraben Modi) यांच्याविरोधात बनवलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित डीपफेक (Deepfake) व्हिडीओवर कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांनी शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी या प्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवली. हा व्हिडीओ 10 सप्टेंबर रोजी बिहार काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला होता.
काय आहे FIR मध्ये नमूद?
एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईची प्रतिमा खराब करणे, बदनाम करणे तसेच कायदा, नैतिकता आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणे हा गंभीर गुन्हा आहे. या संदर्भात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 18(2), 336(3), 336(4), 340(2), 352, 356(2) आणि 61(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला
ही कारवाई दिल्ली भाजप (BJP) निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवर आधारित आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे अशी तक्रार त्यांनी केली होती. फक्त नरेंद्र मोदी यांच्या आईच नव्हे तर सर्व महिला, त्यांचे मातृत्व याचा अवमान करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. गुप्ता यांनी पोलिसांकडे काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने FIR दाखल केली.
डीपफेक व्हिडीओंमुळे चिंता वाढली
गेल्या काही महिन्यांत एआय (AI) आणि डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढला आहे. अनेकदा सार्वजनिक व्यक्तींची प्रतिमा खराब करण्यासाठी, दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी किंवा राजकीय हेतूंसाठी याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा व्हिडिओंवर तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.
दरभंगा घटनेचाही उल्लेख
तक्रारदार भाजप नेते संकेत गुप्ता यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील घटनेचाही उल्लेख केला आहे. भाजप नेते म्हणाले, '27-28 ऑगस्ट रोजी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात झालेल्या काँग्रेस आणि राजदच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अश्लील टिप्पणी करण्यात आली होती. ही संपूर्ण घटना काँग्रेसने सुनियोजित केली होती. निवडणुकीच्या वातावरणावर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न होता असं तक्रारीत म्हटलं आहे.
दिल्ली पोलिस काय म्हणाले?
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, "डीपफेक तंत्रज्ञान समाजासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: जेव्हा ते राजकीय नेत्यांविरुद्ध वापरले जाते तेव्हा त्याचा परिणाम निवडणुकीवर आणि लोकशाही प्रक्रियेवर होऊ शकतो." त्यामुळे या प्रकरणी कायद्याच्या कठोर तरतुदीनुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे.























