Namibian Cheetah Sasha : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू
Namibian Cheetah Sasha : नामिबियामधून भारतात आणलेल्या एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. साशा असे या मादी चित्त्याचे नाव आहे.
Namibian Cheetah Sasha : मध्य प्रदेशमधील कूनो राष्ट्रीय उद्यानातून मोठी माहिती समोर आली आहे. नामिबियामधून भारतात आणलेल्या मादी चित्ताचे निधन झाले आहे. ही चित्ता 5 वर्षांची होती. मागील काही दिवसांपासून साशा चित्ता किडनीच्या आजाराने त्रस्त होती. साशा सुस्त दिसल्याने वन कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती आजारी असल्याचे समजले.
कूनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी या चित्त्यांना सोडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी आरोग्य तपासणीत साशा चित्ताची प्रकृती बरी नसल्याचे समोर आले होते. रक्त तपासणीत तिच्या क्रिएटिनची पातळी अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मूत्रपिंडात संसर्ग झाल्याचे समोर आले. उद्यानातील इतर चित्ते सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Namibian cheetah Sasha has died in Kuno National Park due to kidney-related problem: Top forest official
— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2023
भारतात पुन्हा चित्ता पूर्णपणे नामशेष झाला आहे. भारतात चित्त्यांचे संवर्धन आणि त्यांची वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली. त्या योजनेनुसार, नामिबियामधून पहिल्या टप्प्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 8 चित्ते भारतात आणण्यात आले. त्यामध्ये 5 मादी आणि तीन नर चित्ते होते.
2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ता आणण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर विशेष विमानाने हे आठ चित्ते भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियामधून आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. हे सर्व चित्ते आपल्या नव्या घरी रुळले होते. हे चित्ते शिकारदेखील व्यवस्थितपणे करत होते.
फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांनादेखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे.
जगातील बहुतेक चित्ता दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोत्सवाना येथे आहेत. नामिबियामध्ये चित्त्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. भारतातील शेवटचा चित्ता 1948 मध्ये छत्तीसगडमधील कोरैया जिल्ह्यातील साल जंगलात मृतावस्थेत आढळला होता.