(Source: Poll of Polls)
Mukul Roy Joins TMC: भाजप नेते मुकुल रॉय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश
भाजपचे (BJP)राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची चार वर्षानंतर घरवापसी झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी टीएमसी (TMC)सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज मुख्यमंत्री ममता बनर्जी (CM Mamata Banerjee)यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
कोलकाता : भाजपचे (BJP)राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची चार वर्षानंतर घरवापसी झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी टीएमसी (TMC)सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज मुख्यमंत्री ममता बनर्जी (CM Mamata Banerjee)यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांनी म्हटलं आहे की, घरी येऊन चांगलं वाटत आहे. बंगाल ममता बॅनर्जी यांचा आहे आणि त्यांचंच राहणार. मी भाजपमध्ये राहू शकत नव्हतो असं ते म्हणाले.
मुकुल रॉय यांच्या प्रवेशानंतर ममता बनर्जी यांनी म्हटलं की, मला आनंद आहे की, मुकुल घरी परत आले. भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परत येऊ इच्छित आहेत. आम्ही कधीच कुणाचा पक्ष फोडला नाही. जे पक्षात येऊ इच्छित आहेत, ते पक्षात येत आहेत. इमानदार नेत्यांसाठी तृणमूलमध्ये नेहमीच जागा असेल, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
मुकूल रॉय... कधीकाळी ममता बॅनर्जी यांचे उजवे हात अशी त्यांची ओळख. पण 2017 मध्ये ते भाजपच्या गोटात दाखल झाले होते. मुकूल रॉय यावेळी भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलेत. पण त्यांचा मुलगा शुभ्रांशू पराभूत झालाय. काही दिवसांपूर्वी शुभ्रांशू यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. ज्यात तृणमूलबद्दलची सहानुभूती प्रकट झाली होती. त्यात मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना भेटण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते सर्वात आधी दाखल झाले होते.
ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हा मुकल रॉय यांच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. बंद दाराआड त्यांची 10 -15 मिनिटे चर्चाही झाली होती. त्यानंतर बंगालच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. पण या केवळ वावड्या असल्याचं भाजप नेते सांगत होते. त्यात काही संभाव्य धोका टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोनही मुकुल रॉय यांना गेला होता. त्यांनी फोनवरुन त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
भाजपचे 33 आमदार तृणमूलच्या संपर्कात?
ममता बॅनर्जी यांनी प्रचंड बहुमतानं बंगालमध्ये वर्चस्व राखल्यानंतर अनेक नेत्यांना परतीचे वेध लागले आहेत, अशी माहिती आहे. भाजपच्या सोनाली गुहा निकालानंतर म्हणाल्या मी ममतांशिवाय जगूच शकत नाही, पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी माझी अवस्था आहे. फुटबॉलमधून राजकारणात आलेला दीपेंदू बिश्वास यांनीही ममतांना पत्र लिहित पुन्हा तृणमूलचा झेंडा हाती घ्यायची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. ममतांच्या आधीच्या मंत्रिमंडळात असलेले राजीव बॅनर्जी हे देखील भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत.