Hanuman Chalisa Row : अटकेबाबत खासदार Navneet Rana आज संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर बाजू मांडणार
Hanuman Chalisa Row : खासदार नवनीत राणा आज संसदीय विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार आहेत. त्यांना झालेली अटक आणि खार पोलीस ठाण्यात झालेल्या कथित अमानवी वागणुकीबाबत त्या आपली बाजू मांडणार आहेत.
Hanuman Chalisa Row : महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अटकेसंदर्भात आज लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनीत राणा यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता संसद भवन अॅनेक्सी एक्स्टेंशन इथे बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खासदार नवनीत राणा आपली मुंबईतील अटक आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातील गैरव्यवहाराबाबत बाजू मांडणार आहेत.
नवनीत राणा यांनी 25 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयाला पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती. लोकसभा खासदार असल्याने नवनीत राणा यांची तक्रार लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आली होती. झारखंडमधील चत्राचे भाजप खासदार सुनील कुमार सिंह हे या 15 सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या समितीमध्ये एक जागा रिक्त आहे.
नवनीत राणा यांचं लोकसभा सचिवालयाला पत्र
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चाली वाचण्याची घोषणा केल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना गेल्या महिन्यात 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शनं करुन त्यांना बाहेर पडू दिलं नाही.
नवनीत राणा यांनी सभापती आणि लोकसभा सचिवालयाला पत्र पाठवून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं आणि नंतर खार पोलीस ठाण्यात गैरवर्तन झाल्याचा आरोप केला होता. यावर समितीचे उपसचिव म्हणाले की, "नवनीत राणा यांच्या तक्रारीसंदर्भात विशेषाधिकार भंगाच्या गंभीर आरोपांची समिती सुनावणी करणार आहे. कारण पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसंच खार पोलीस ठाण्यात त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली होती, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान 5 मे रोजी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीत गेलं होतं आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्याचवेळी मुंबई पोलिसांवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत विशेषाधिकार समितीसमोर सुनावणीची मागणी केली होती.