Sidhi Viral Video: भाजप कार्यकर्त्याचं लघुशंका प्रकरण, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी आदिवासी तरुणाचे धुतले पाय
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तरूणाला भोपाळ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवले. त्यानंतर या तरुणाचे स्वागत करण्यात आले त्याचे पाय धुतले. याचा व्हिडीओ स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्वीट केला आहे
Bhopal News: मध्यप्रदेशातील एका भाजप मद्यधुंद आमदाराने पायऱ्यांवर बसलेल्या आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवर टीका झाली होती. त्यानंतर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तरूणाला भोपाळ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवले. त्यानंतर या तरुणाचे स्वागत करण्यात आले त्याचे पाय धुतले आणि तरूणाचा सन्मान केला.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत तरूणाचा सन्मान केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विटर लिहिले की, मी हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. जेणेकरून सर्वांना समजावे की. मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचे सरकार आहे. त्यामुळे या राज्यातील जनताच देव आहे. त्यामुळे जनतेवरील कोणावरही अत्याचार सहन केला जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान हाच माझा सन्मान आहे.
यह वीडियो मैं आपके साथ इसलिए साझा कर रहा हूँ कि सब समझ लें कि मध्यप्रदेश में शिवराज सिंह चौहान है, तो जनता भगवान है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 6, 2023
किसी के साथ भी अत्याचार बर्दाश्त नहीं किया जायेगा। राज्य के हर नागरिक का सम्मान मेरा सम्मान है। pic.twitter.com/vCuniVJyP0
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली. त्याचे नाव पाले कोल असून तो सिधी जिल्ह्यातील करोंडी गावचा आहे.भाजप नेता प्रवेश शुक्ला असे हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली.
आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजप आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने भाजपवर हल्ला केला. हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही आणि त्याचा आधीच राजीनामा घेण्यात आला होता. दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.