बहुतांश महिलांकडून ब्रेकअपनंतर बलात्काराचे गुन्हे दाखल; छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य
महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
छत्तीसगढ : बहुतांश मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करता, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. तसेच लिव्ह इन रिलेशन संपल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होत असल्याचंही नायक यांनी म्हटलं. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच नायक यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये असा सल्लाही किरणमयी नायक यांनी दिला आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर बोलताना नायक यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या की, "अनेक प्रकरणांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि सहमतीन संबंध ठेवल्यानंतर काही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, तुम्ही आधी नातं समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या अशा रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा परिणाम अत्यंत वाईट असतील."
किरणमयी नायक एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी एक विचित्र सल्लाही यावेळी दिला आहे. त्या म्हणाल्या की, "माझा सल्ला आहे की, जर तुम्ही अल्पवयीन असाल तर कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात अडकू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. आजच्या काळात वयाच्या 18व्या वर्षी लग्न होताना दिसत आहेत. काही वर्षांनी जेव्हा मुलं होतात, त्यानंतर जोडप्यांना एकत्र राहणं अवघड होतं."
"सहमतीने संबंध ठेवल्यानंतर जर नातं तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला आणि पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे." ; असंही नायक म्हणाल्या.