(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : देशातील कोरोनाचा आलेख घसरतोय, निर्बंध 30 जून पर्यंत कायम; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या सूचना
देशातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटिंग या सूत्रांचा वापर करण्यात येणार असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
नवी दिल्ली : गेल्या 20 दिवसांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख घसरतोय, तरीही सध्याची रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरु असलेले निर्बंध 30 जून पर्यंत कायम राहतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. देशातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटिंग या सूत्रांचा वापर करण्यात येणार असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून जास्त बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत अशा जिल्ह्यांवर जास्त लक्ष देण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या होत्या. त्या सूचना आताही कायम ठेवण्यात आल्या आहेत.
The country is seeing a steady decline in daily new #COVID19 cases, after reaching a peak on 7 May 2021
— PIB India (@PIB_India) May 27, 2021
Less than 3 lakh daily cases since 17th May
Joint Secretary, @MoHFW_INDIA #IndiaFightsCorona pic.twitter.com/ltgmapzGLd
देशातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे, रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच देशातील 24 राज्यांमध्ये रोजच्या नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
देशात 44 दिवसांनी कोरोनाबाधितांची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकेडवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 86 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3660 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी काल दिवसभरात 76,755 रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 211,298 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3847 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या :
- लोकांना वाटण्यासाठी नेते आणि सेलिब्रिटींकडे रेमडेसिवीर कुठून येतं? याची चौकशी व्हावी : हायकोर्ट
- दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आता घराजवळच्या केंद्रावर लस घेता येणार; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Monsoon Alert : 31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती : आयएमडी