Milk Price : दूध आणि दह्याचे दर पुन्हा वाढू शकतात, मदर डेअरीकडून स्पष्ट संकेत
Mother Dairy : मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत.
नवी दिल्ली : दूध आणि दह्याचे दर वाढण्याची शक्यता कायम आहे. आघाडीच्या डेअरी कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या मदर डेअरीने याबाबतचे संकेत दिले आहेत. जर सध्याचा खर्च वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला तर आम्ही 3-4 महिन्यांनंतर किंमत वाढविण्याचा विचार करू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे. मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. या वर्षी मार्चमध्येही कंपनीने दुधाच्या दरात तेवढीच वाढ केली होती.
पशुखाद्याची किंमत झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विक्री किंमत वाढवावी लागली आहे. त्यामुळे डेअरी कंपन्यांचा दूध खरेदी खर्च वाढला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीत वाढ झाल्यानंत दूध खरेदी खर्च प्रति लिटर 2 रुपयांनी वाढला आहे. जर खर्च कमी झाला नाही तर आम्ही किमती वाढविण्याचा विचार करू शकतो डेअरी चालकांचे म्हणणं आहे.
कंपनीचा व्यवसाय वाढण्याची अपेक्षा
आमच्या उत्पादनांना चांगली मागणी असल्याने कंपनीचा व्यवसाय चालू आर्थिक वर्षात 20 टक्क्यांनी वाढून सुमारे 15,000 कोटी रुपये होईल. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 12,500 कोटी रुपये होती. कंपनी डेअरी, खाद्यतेल आणि फळे आणि भाजीपाला देखील विकते असं कंपनीचे एमडी मनीष बंदलीश यांनी सांगितलं.
मनीष बंदलिश यांनी IDF-वर्ल्ड डेअरी समिटच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला सांगितले की, चालू आर्थिक वर्षात व्यवसाय 20 टक्क्यांनी वाढून सुमारे 15,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची आमची अपेक्षा आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण आणि किमती या दोन्हीमुळे ही वाढ होईल, असे ते म्हणाले.
उत्पादनासाठी मजबूत मागणी
आम्ही आमच्या सर्व दुधाला आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना जोरदार मागणी पाहत आहोत. उन्हाळ्यात आईस्क्रीमच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 2020 आणि 2021 मध्ये आईस्क्रीमच्या विक्रीवर परिणाम झाल्याचं बंदलीश यांनी सांगितले. कंपनी 'धारा' ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि 'सफल' ब्रँड अंतर्गत ताजी फळे आणि भाज्या विकते.