Covid 19 Updates: कोरोनासंबंधी केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, राज्यांना सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
Mansukh Mandaviya On Corona Updates: केंद्राने आणि राज्याने समन्वय साधून कोरोनासंबंधित व्यवस्थापनेची सर्व तयारी पूर्ण केली पाहिजे असं आरोग्यमंत्री मनसुख मांडविय म्हणाले.
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिले आहेत. या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून एकभावनेनं काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेतली. आजच्या बैठकीत त्यांनी कोरोनासंबंधीत ताजी स्थिती काय, तसेच राज्यांची त्यासंदर्भात तयारी काय आहे याचा आढावा घेतला. जगभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्याचा पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत.
राज्यानी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावं आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे असेही निर्देश त्यांनी दिले.
Emphasized on the need to be alert in COVID-19 review meeting with State Health Ministers.
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 23, 2022
There is no need to panic. We have 3 years of experience in pandemic management. The Centre Govt will provide all the support to combat COVID-19. We will take action as per the needs. pic.twitter.com/z4QsMZMbEX
Mansukh Mandaviya On Corona Updates: परदेशातून भारतात येणाऱ्यांची कोरोना चाचणी होणार
जगभरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता भारतात येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची रॅन्डमली कोरोना चाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गरज पडली तर सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेतली जाईल असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं.
ओमिक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण सापडले
भारतामध्ये ओमिक्रॉनच्या (Omicron) BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण
आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार देशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
राज्यांसाठी केंद्राचे मार्गदर्शक तत्वे जारी
दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाचे सँपल जीनोम टेस्टिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. यातून जीनोम सिक्वेन्सिंग होऊ शकेल आणि जर कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला तर त्याला ट्रॅक करता येऊ शकेल.