Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची या वर्षातील शेवटची 'मन की बात', शेतकरी आंदोलनावर काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह कोरोना आणि गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह कोरोना लस आणि गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 29 नोव्हेंबरच्या मन की बातमध्ये बोलताना कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटलं होतं.त्यांनी म्हटलं होतं की, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.
सरकारकडून काय अपेक्षा? मतही मागवलं
कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं होतं. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवलं आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली होती. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत." या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले होते. याबाबत लोकांनी आपला संदेश 'MyGov' आणि 'नमो अॅप' वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं.
27 सप्टेंबरच्या मन की बात मध्ये शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेवर भाष्य केलं होतं. देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असं मोदी म्हणाले होते.
डिसलाईकमुळे मन की बातची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.
2014 पासून सतत करत आहेत मन की बात पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 72 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.
महत्वाच्या बातम्या: