Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! गाडीमध्ये बॉम्बस्फोट, 3 जण जखमी
Manipur Violence Update : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटताना दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात हिंसाचारामुळे सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Manipur Violence Latest News : भारताच्या ईशान्येकडील मणिपूर (Manipur) राज्यात हिंसाचार (Violence) थांबण्याचं नाव घेत नाही. मणिपूरमध्ये एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथे एका पुलाजवळ उभ्या असलेल्या एसयूव्हीमध्ये बॉम्बस्फोट झाला, यामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, कारमध्ये एक बॉम्ब ठेवण्यात आला होता, ड्रायव्हर कारमधून खाली उतरताना याचा स्फोट झाला असावा, असा अंदाज आहे. यावेळी गाडीजवळ उभे तीन जण जखमी झाले. बुधवारी, 21 जून रोजी ही घटना घडली. या अपघातातील सर्व जखमींना बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
मणिपूरमध्ये गाडीमध्ये बॉम्बस्फोट, तीन जण जखमी
मणिपूर राज्यात सतत हिंसाचार सुरू आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये वास्तव्य करावं लागत आहे. मणिपूरमध्ये अधूनमधून गोळीबारही सुरू आहे. मणिपूरमध्ये जवळपास 50 दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण हिंसाचाराच्या घटना थांबत नाहीत.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 8.30 ते 9.30 वाजेदरम्यान गेल्जंग आणि सिंगडा येथे मधूनमधून चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, हा गोळीबार कोणालाही उद्देशून नव्हता, तर हवेत फायरिंग करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय कांगचुप सेक्टरमधील गेल्झांग आणि सिंगडा येथूनही अधूनमधून गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच
मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला. मेईतेई समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ 3 मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. तेव्हापासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसक संघर्ष सुरू आहेत. हिंसाचाराच्या काळात राज्यातील काही मंत्र्यांच्या घरांची जाळपोळही करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी केंद्राकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक
मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने 24 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बुधवारी (21 जून) अधिकृत हँडलवरून ट्विट करून बैठकीची माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 जून रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे."