राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार : संभाजीराजे छत्रपती
"पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं संभाजीराजे म्हणाले. एबीपी माझासोबत संवाद साधताना संभाजीराजेंनी आपल्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केलं.
नवी दिल्ली : राजकारणात उतरायचंय ते आता निश्चित आहे. कोल्हापुरात 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. "पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं संभाजीराजे म्हणाले. एबीपी माझासोबत संवाद साधताना संभाजीराजेंनी आपल्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केलं.
पुढे काय करणार लवकरच जाहीर करणार : संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. संभाजीराजे पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहे. 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. "पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार," असं त्यांनी सांगितलं.
राजकारणात उतरायचं हे आता निश्चित : संभाजीराजे
दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, "दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे."
भूमिका ठरवण्याआधी गुजरातला जातोय कारण...
संभाजीराजे गुजरात दौरा करणार आहेत. भूमिका ठरवण्याआधी गुजरातमध्ये जात आहे त्याचं कारण काय, "या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज राजकोटला शिकले होते. मी तिथला माजी विद्यार्थी आहे. तिथल्या शाळेला अभिवादन करण्यासाठी तिथल्या लोकांनी मला बोलावलं आहे."
राज्यसभेचे खासदार ते मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा
भाजपच्या शिफारशीवरुन 11 जून 2016 रोजी राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभा खासदार झाले होते. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ आज (3 मे) संपत आहे. या कालावधीत भाजपच्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात त्यांची फारशी उपस्थिती दिसून आली नाही. सध्या त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा ते चेहरा बनले आहेत. मराठा आरक्षणासाठी ते रस्त्यावरच तर न्यायालयीन लढा लढत आहेत.