Digvijaya Singh : दिग्विजय सिंह यांच्यासह 6 जणांना एक वर्षासाठी सश्रम कारावास, 11 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह सहा जणांना प्रत्येकी एक-एक वर्षासाठी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Madhya Pradesh News : 2011 मध्ये मध्य प्रदेशातील उज्जैन येथे भारतीय जनता युवा मोर्चा (Bharatiya Janata Yuva Morcha) च्या आंदोलक कार्यकर्त्यांशी झालेल्या संघर्षा प्रकरणी इंदूरमधील विशेष न्यायालयानं शनिवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांच्यासह सहा जणांना प्रत्येकी एक वर्षासाठी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने सहाही दोषींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश मुकेश नाथ यांनी दिग्विजय आणि उज्जैनचे माजी लोकसभा खासदार प्रेमचंद गुड्डू यांना भारतीय दंड संहिता (IPC) कलम 325 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणं) आणि 109 (हल्ला करण्यास प्रवृत्त करणं) या कलमांतर्गत अंतर्गत दोषी ठरवलं. तर अनंत नारायण, जयसिंह दरबार, अस्लम लाला आणि दिलीप चौधरी यांना कलम 325 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं.
उज्जैन जिल्ह्यातील तराना भागातील काँग्रेस आमदार महेश परमार, मुकेश भाटी आणि हेमंत चौहान या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. नंतर, दिग्विजय यांच्यासह सहाही दोषींनी अपील केल्यानंतर, विशेष न्यायाधीशांनी तात्काळ त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि 25,000-25,000 रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली.
जामिनावर सुटका झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी सांगितलं की, ते विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर खोटा असल्याचं सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "घटनेच्या मूळ एफआयआरमध्ये माझं नाव आरोपी म्हणून नोंदवलं गेलं नव्हतं. नंतर राजकीय दबावापोटी पोलिसांनी माझं नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट केलं आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2011 रोजी दिग्विजय सिंह यांचा ताफा उज्जैनच्या जिवाजीगंज परिसरातून जात असताना, वेगळ्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या निदर्शनादरम्यान दिग्विजय, गुड्डू आणि इतरांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी झटापट झाली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha