Tandoor Roti : 'या' शहरात तंदूर रोटीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास 5 लाखांचा दंड, जाणून घ्या नेमकं कारण
Tandoor Roti : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तंदूर भट्टी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालकास पाच लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Tandoor Roti : हॉटेलमध्ये गेल्यानंतर तंदूर रोटीशिवाय (Tandoor Roti) जेवण अपूर्ण वाटतं. मात्र, भारतातील एका शहरात तंदूर रोटीवर बंदी (Ban On Tandoor Roti) घालण्यात आली आहे. तंदूर रोटी तयार केल्यास दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) शहरात तंदूर रोटीवर बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने भट्टीवर (Tandoor Bhatti) तंदुरी रोटी बनविण्यास बंदी घातली आहे.
तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा आदेश येताच हॉटेल मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर तंदुरी रोटी खाणाऱ्या ग्राहकांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या हॉटेलमालकांवर लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो. त्यामुळे हॉटेल मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील 50 हॉटेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाचा वापर होणाऱ्या तंदूर भट्टी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. इलेक्ट्रिक किंवा एलपीजी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाच लाखांचा दंड
तंदूरमधील कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे प्रदूषण पसरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तंदूर रोट्यांमध्येही कार्बनचे प्रमाण अधिक असते. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तंदूरऐवजी आता इलेक्ट्रिक किंवा एलपीजी गॅस शेगडीचा वापर करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाच्या आदेशावर हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा हा आदेश व्यावहारिक वाटत नसल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक आणि एलपीजी स्टोव्हमध्ये तंदूरसारख्या रोट्यांची चव चांगली नसते असे त्यांचे म्हणणे आहे.
ओव्हनचा वापर महाग
प्रशासनाने हॉटेल मालकांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी वापरल्यास तंदुरी रोटी महाग होईल, असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. तंदूर बंद करण्यासाठी प्रशासनाने अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण पथके तैनात केली आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी त्यावरून आता हॉटेल चालक-मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रदूषणाला रोखण्यासाठी इतरदेखील काही पर्याय असू शकतात, असा सूरही उमटत आहे.