(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणारा फेक व्हिडीओ बनवला, काश्मीरच्या यूट्यूबरला अटक
Jammu Kashmir Youtuber Arrested: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या शिरच्छेदाचा फेक व्हिडीओ बनवून अपलोड केल्या प्रकरणी काश्मीरमधील एका यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे.
Jammu Kashmir Youtuber Arrested: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या शिरच्छेदाचा फेक व्हिडीओ बनवून अपलोड केल्या प्रकरणी काश्मीरमधील एका यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. फैसल वानी असं अटक करण्यात आलेल्या युट्यूबरचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि लोकांमध्ये भीती निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याच दरम्यान त्याने व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल माफी मागितली. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आपल्या अटकेपूर्वी वानीने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तो म्हणाला आहे की, लोकांच्या किंवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, यूट्यूबर फैसल वानी याला अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक शांततेच्या विरोधात असलेला आक्षेपार्ह व्हिडीओ त्याने यूट्यूबवर अपलोड केला होता आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम 505 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सफा कडल पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 505 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाणी त्याचे यूट्यूब (YouTube) चॅनल "डीप पेन फिटनेस" चालवत असून तो सोशल मीडियावर सक्रिय आहे.
व्हिडीओबद्दल माफी मागितली
फैसल वानीने अटके आधी नवीन व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मी काल रात्री नुपूर शर्माचा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा एक VFX व्हिडीओ होता, जो संपूर्ण भारतभर व्हायरल झाला होता. मी निर्दोष असून मला फसवण्यात आले आहे. इतर कोणत्याही धर्माला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही, कारण इस्लाम आपल्याला इतरांचा आदर करायला शिकवतो. वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाले की, मी सर्व धर्मांचा आदर करतो. होय, मी तो व्हिडीओ बनवला आहे, पण कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी काल रात्री व्हिडीओ काढून टाकला, पण त्याबद्दल मी माफी मागतो. मला माफ करा.