(Source: ECI/ABP News/ABP Majha)
14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर
Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानाच्या देशात 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे.
Lord Venkateswara's properties across India : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी देवस्थान (Tirupati Balaji Temple) एक आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. भाविकांकडून मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी दिली जाते. रोख रक्कम, सोनं चांदीसह अनेक गोष्टी मंदिराला दान केल्या जातात. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होतं असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने एकूण संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानाच्या देशात 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. त्याशिवाय सोनं आणि एफडीच्या स्वरुपातही मंदिराची संपत्ती आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टकडे देशभरात 960 मालमत्ता आहेत. ही मालमत्ता सात हजार 123 एकरमध्ये आहे. याची एकूण किंमत 85705 कोटी रुपये इतकी आहे. पत्रकारांशी बोलताना वाय वी सुब्बा रेडी म्हणाले की, 1974 ते 2014 यादरम्यान विविध सरकार अंतर्गत वेगवेगळ्या टीटीडी ट्रस्टमार्फत विविध कारणामुळे मंदिर ट्रस्टने संबधित 113 प्रॉपर्टी निकाली काढल्या. पण 2014 नंतर टीटीडीची कोणतीही प्रॉपर्टी निकाली काढली नाही.
14,000 कोटींची एफडी -
तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक राष्ट्रीय बँकेत तिरुपती बालाजी मंदिरामार्फत एफडी काढण्यात आल्या आहेत. 14 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या एफडी मंदिरानं काढल्या आहेत. 14 टन पेक्षा जास्त सोन्याचा साठाही मंदिराकडे आहे.
दरवर्षी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प -
तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करत गेल्यावर्षीपासून दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माझ्या अध्यक्षत्येखालील विश्वस्त मंडळाने हा संकल्प केला होता. 2021 मध्ये पहिली श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भक्त आणि भाविकांना पादर्शक कारभार आणि देवस्थानाच्या संपत्तीचे जतन करण्याचा आमचा विश्वास आहे आणि मंदिर ट्रस्टच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा आहे.