(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूपीच्या राजकारणात भगवान परशुरामाची एन्ट्री, सपा-बसपात मोठा पुतळा उभारण्याची स्पर्धा
राजकारणात काही अल्पसंख्यांक घटकांना गळाला लावण्यासाठी लांगुलचालनाचं राजकारण सुरु असतं. सहसा अनेक मागास घटकांसाठीच हा प्रयत्न सुरु असतो हा आपला समज. पण यूपीच्या राजकारणात सध्या हे लांगुलचालन सुरु आहे ब्राह्मण मतांसाठी...
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या एन्ट्री झालीय भगवान परशुरामाची. समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात जणू स्पर्धा लागलीय की भगवान परशुरामाचा मोठा पुतळा कोण उभारणार याची. अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात ब्राह्मण अस्मितेला गोंजारण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. मागच्या आठवड्यात अखिलेश यादव यांनी आपलं सरकार आल्यास 108 फुटांची भगवान परशुरामाची मूर्ती यूपीच्या सर्व जिल्ह्यांत बसवणार असल्याचं जाहीर केलं. त्यावर पाठोपाठ मायावतींचं उत्तर आलं. त्यापेक्षा मोठी मूर्ती बसवणार असल्याचं मायावती यांनी सांगितलं.
समाजवादी पक्ष हा यादव-मुस्लिमांचा तर बसपा हा दलितांचा अशी सर्वसाधारण रचना यूपीच्या राजकारणात आहे. पण अचानक हे दोघे ब्राह्मणांच्या तुष्टीकरणाकडे का वळतायत हा खरा प्रश्न आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात ठाकूर विरुद्ध ब्राह्मण हा अगदी पूर्वापार चालत आलेला संघर्ष. राजकारण, सरकारी कंत्राटं इतकंच काय गुन्हेगारीत सुद्धा हा संघर्ष भिनला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मूळ नाव अजयसिंह बिश्त, ते ठाकूर आहेत. सत्तेत आल्यापासून ब्राह्मणांना बेदखल केलं जात असल्याचा छुपा प्रचार यूपीत चालू आहे. त्यात गेल्या महिनाभरातली दोन प्रमुख प्रकरणं यात आणखी भर टाकणारी ठरली.
विनय दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणात यूपी पोलिसांनी त्याच्या पाच ब्राह्मण साथीदारांचाही खात्मा केला. त्यानंतर सोशल मीडियावर योगी सरकारविरोधात परशुरामाच्या चित्रांची पोस्टर लावून अनेकांनी त्यांना ब्राह्मणद्वेषी ठरवलं. त्यात मागच्या आठवड्यात गाझियाबादमध्ये एका ब्राह्मण पत्रकाराची हत्या झाली. हे प्रकरणही पोलीस नीट हाताळत नसल्याचा आरोप होत आहे.
यूपीत एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकसंख्या ही ब्राह्मण समाजाची आहे. एकेकाळी काँग्रेसकडे असलेला हा वर्ग 1990 च्या दशकात भाजपकडे शिफ्ट झाला. 2007 मध्ये यूपीत मायावतींचं सरकार आलं, तेव्हा त्यांनी ब्राह्मण समाजालाही सोबत घेतलं होतं. एकट्या ब्राह्मण मतांवर सरकार बनत नसलं तरी सत्तेचा डाव खराब करणयाची ताकद या मतांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळेच मायावती, अखिलेश यांची ही खटाटोप सुरु आहे.
उत्तर प्रदेशात येत्या दीड वर्षात निवडणुका होणार आहेत. पण आतापासूनच त्याची रणनीती आखणं सुरु झालं आहे. उत्तर प्रदेशात ठाकूर विरुद्ध ब्राह्मण संघर्ष तयार करुन भाजपच्या मतांमध्ये फूट पाडण्याची ही नीती किती यशस्वी होणार हे कळायला अजून बराच अवकाश आहे. भाजपने राम मंदिराच्या भूमिपूजनातून सुरुवात केलीच आहे. आता त्याला उत्तर म्हणून परशुराम आणण्याची तयारी सपा, बसपा करत आहेत.
सत्ता आल्यावर परशुरामाचा मोठा पुतळा उभारणार : सपा, बसपा