Lockdown | ओलाची देशातील 22 विमानतळांवर पुन्हा सेवा सुरू
ओला कंपनीने देशभरातील 22 विमानतळांवर आपली सेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओलाने प्रवाशांसाठी विशेष काळजी घेतली आहे.
मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. 60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी सोमवारपासून (25 मे) टेकऑफ केलं. विमानसेवा जरी सुरू असली तरी अद्याप सार्वजनिक वाहतूकीला परवानगी दिली नाही. त्यामुळे विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. हा विचार करत ओला कंपनीने देशभरातील 22 विमानतळांवर आपली सेवा सुरू केली आहे. देशातील 22 विमानतळांवर उतरणारे प्रवासी सहज ओला कॅब बुक करु शकतात. ओलाने प्रवाशांसाठी विशेष काळजी घेतली आहे.
ओला कंपनीचे प्रवक्ते आनंद सुब्रमण्यन म्हणाले, ओला कॅबची सेवा पुन्हा आता मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबादसह देशातील अन्य विमानतळावर सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही विशेष काळजी घेतली आहे. ज्यासाठी आम्ही कॅबचालकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. कोणताही ड्रायव्हर मास्क, हॅण्ड ग्लव्ज्, सॅनिटायझर आणि फेस शिल्ड शिवाय गाडी चालवणार नाही. ओला कॅब दररोज सॅनिटाइज केली जाणार आहे. तसेच कन्टेन्मेंट झोनमध्ये ओला कंपनी सेवा देणार नाही.
वाहन चालकांबरोबरच आम्ही प्रवाशांसाठी देखील काही नियम बनवले आहे. ज्याचे पालन प्रवाशांनी करणे अनिवार्य आहे. स्वत:च्या आणि चालकाच्या सुरक्षिततेसाठी मास्क घालणे गरजेचे आहे. एका कॅबमध्ये केवळ दोनच प्रवासी असणार आहे. प्रवासदरम्यान प्रवाशांना त्यांचे सामान स्वत: गाडीत चढवावे लागणार आहे. तसेस गाडीत एसी लावला जाणार नाही आणि पेमेंट हे कार्डने करायचे आहे. मुंबई, बंगळूरु, दिल्ली, चंदिगढ, कोएम्बतरु, डेहरादून, गुवाहटी, हैदराबाद, अहमदाबाद, अमृतसर, भोपाळ, भुवनेश्वर, इंदौर, जयपूर, कोची, मदुराई, मंगळूरु, पटना, रायपूर, रांची, वाराणसी, विशाखापट्टणम या शहरांमध्ये ओलाची सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. गरज पडली तर देशातील इतर शहरात देखील ओलाची सुरुवात करण्यात येईल, असे आनंद सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
Domestic Flights | विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
Domestic Flights Resume | 60 दिवसांनी टेकऑफ, देशांतर्गत विमान सेवा सुरु
Mumbai-Delhi Airport Travel | 'माझा'चा मुंबई ते दिल्ली हवाई रिपोर्ट,कशी आहे लॉकडाऊननंतरची विमानसेवा?