एक्स्प्लोर
राजकारणातला झंझावात... जॉर्ज फर्नांडिस
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात जॉर्ज फर्नांडिस यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या तिकीटावरुन लोकसभा लढवली. जॉर्ज यांनी स. का. पाटील यांना विक्रमी मतांनी पराभूत केलं. याच पराभवाने स. का. पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
मुंबई : जॉर्ज फर्नांडिस... विसाव्या वर्षी स्वतःच्या गरिबीमुळे पेटून उठलेला हा तरुण देशाच्या राजकारणातल्या सर्वात शालीन पण तितकाच बंडखोर नेता ठरला... जॉर्ज फर्नांडिस यांची कहाणी जणू एका थरारक फिल्मची स्क्रिप्ट आहे... त्यात संघर्ष आहे... ड्रामा आहे... राजकारण आहे... रोमांचही आहे... आणि रोमान्सही आहे...
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 1930 मध्ये मंगळुरुतल्या एका साधारण कुटुंबात झाला. शिक्षण मंगळुरातच झालं. कर्मठ कुटुंबियांनी जॉर्ज यांना धार्मिक शिक्षणासाठी बंगळुरुला पाठवलं, पण तिथं त्याचं मन रमेना. त्यामुळे ते घर सोडून पळून गेले आणि मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करु लागले.
1950 चं दशक होतं... जॉर्ज फर्नांडिस विशी-पंचविशीचे होते. मंगळुरुहून मुंबईत आलेल्या जॉर्ज यांच्यावर पहिला प्रभाव पडला, तो समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा.
देशाला स्वातंत्र मिळून काहीच वर्षे झाली होती आणि तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांसाठी जॉर्ज पोटतिडकीने बोलू लागले.
1955 च्या सुमारास त्यांच्या करारी भाषणांमुळेच त्यांची 'कामगारांचा नेता' अशी ओळख बनली. पुढची दहा वर्षे फर्नांडिस यांनी कामगार चळवळीला आकार दिला. फर्नांडिस मुंबईतल्या कामगारांचा आधारवड बनले आणि साठच्या दशकातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
त्यांनी पहिलाच दणका दिला तो मुंबई महापालिकेमध्ये... कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने अर्ध्याहून अधिक मुंबई जॉर्ज यांच्या पाठीशी उभी राहिली आणि फर्नांडिस थेट मुंबई महापालिकेमध्ये पोहचले.
काही काळातच फर्नांडिसांनी मुंबईतून आपलं लक्ष देशावर केंद्रित केलं आणि साठच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या तिकीटावरुन लोकसभा लढवली. स. का. पाटील यांना जॉर्ज यांनी विक्रमी मतांनी पराभूत केलं. याच पराभवाने स. का. पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
कामगारांच्या आणि शोषित आणि पीडितांच्या हक्कांचा आवाज आता लोकसभेत पोहोचला होता. अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर जॉर्ज असायचेच आणि जेव्हा आणीबाणी लागली, तेव्हा तर जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर 1977 ला आणीबाणी उठली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.
1977 ला मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वात जनता पार्टीने निवडणूक जिंकली आणि जॉर्ज फर्नांडिस हे मुजफ्फरपूरमधून निवडून आले. मोरारजी सरकारमध्ये ते उद्योगमंत्री झाले आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीला वेग मिळाला. आपल्या 50 वर्षांच्या राजकीय वाटचालीत ते तब्बल 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले.
80 च्या दशकात जय-पराजयाचा सिलसिला सुरु होता. दशकाच्या उत्तरार्धात जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे मंत्रीही झाले आणि त्यांच्याच काळात रेल्वेची सर्वाधिक प्रगती झाली. त्यांच्याच काळात कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विचार पुढे आला.
90 च्या दशकात जेव्हा वाजपेयींचं सरकार सत्तेत आलं, तेव्हा जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे संयोजक बनले. एनडीएच्या सरकारमध्ये फर्नांडिस दोन वेळा संरक्षणमंत्री बनले. त्यांच्याच काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला, पण कारगिलच्या युद्धामध्ये भारताना पाकिस्तानला धूळ चारली.
फर्नांडिस संरक्षण मंत्री असतानाच भारताने पोखरणच्या अणुचाचण्या केल्या, पण त्यांच्याच काळात तहलकाने उघडकीस आणलेल्या संरक्षण घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला
जॉर्ज फर्नांडिस यांनी उद्योगमंत्रीपदही भूषवलं. त्यांच्याच काळात गुंतवणुकीच्या उल्लंघनावरुन आयबीएम आणि कोका-कोलासारख्या कंपन्यांना त्यांनी देशातून हाकलून लावलं.
राजकीय कारकीर्दीतले चढ उतार फर्नांडिस यांच्याही वाट्याला आले. जनता दलातून फुटलेल्या जनता दल युनायटेडमध्येही मतभेद सुरु झाले आणि फर्नांडिस यांनी नितीश कुमार यांच्याशी फारकत घेतली. 2009 साली ते अपक्ष म्हणून लढले, पण पराभूत झाले.
50 वर्षे देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या, विरोधकांना अंगावर घेणाऱ्या, पण तितकेच साधे जीवन जगणाऱ्या माणसांची पिढी आता इतिहासजमा झाली. जॉर्ज फर्नांडिस हे त्याच पिढीतलं एक नाव आज अमर झालं.
ते म्हणालेच होते... राजनीती म्हणजे माणसं... त्यांचं सुख... आणि त्यांचं दुःख... बाकी सब बकवास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement