Lalu Yadav Health Update : खांद्याच्या दुखापतीमुळं हलणंही अशक्य, लालू यादव यांची प्रकृती गंभीर; दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु
Lalu Prasad Yadav Health Updates : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर. पुढील उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीला हलवण्यात आलं आहे.
Lalu Prasad Yadav Health Updates : आरजेडी (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu prasad Yadav) यांच्यावर दिल्ली एम्समध्ये (Delhi AIIMS) उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री 10 वाजता त्यांना पाटण्याहून दिल्लीला एअर अॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं. दिल्लीत पोहोचल्यानंतर लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, "खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना हालचाल करणं शक्य होत नाही. तसेच, एम्समध्ये यापूर्वीही त्यांनी उपचार घेतले आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती आधीपासूनच आहे."
तेजस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "लालू प्रसाद यादव यांच्या शरीरात तीन ठिकाणी फ्रॅक्चर आहेत. त्यामुळे त्यांना हालचाल करणं शक्य नाही. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेक औषधं त्यांना दिली जात आहेत. औषधांचा परिणाम त्यांच्या हृदयावर आणि किडनीवर होऊ नये म्हणून त्यांना पाटणाहून दिल्लीला हलवण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये त्यांचं संपूर्ण चेकअप केलं जाईल. तसेच, पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीहून सिंगापूरला नेण्याबाबतही डॉक्टरांशी चर्चा सुरु आहे. त्यांना दोन ते तीन दिवसांपासून ताप येत आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पुढील काही आठवड्यांत त्यांच्या तब्येतीत आणखी सुधारणा झाल्यावर आम्ही त्यांना सिंगापूरला नेण्याबाबत विचार करु."
लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Former Chief Minister Rabri Devi) यांनी सांगितलं की, "काळजी करु नका. त्यांच्यावर योग्य पद्धतीनं उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकरात लवकर बरे होतील. तसेच, बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी पाटणातील पारस रुग्णालयात जाऊन लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांना पाहुन भावून झाले. ते म्हणाले की, लालू माझे जुने सहकारी आहे. त्यांना लवकर बरं वाटू देत. नितीश कुमार म्हणाले की, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे.
दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. लालू प्रसाद यादव काही दिवसांपूर्वी शिडीवरुन पडल्यामुळे जखमी झाले होते. बिहारची राजधानी पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. लालूंच्या खांद्यावर आणि कमरेलाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी काळजी करण्यासारखं काहीही नसल्याचं सांगितलं होतं. उजव्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेत होते. पण काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना पाटणातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता पुढच्या उपचारांसाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.