Lal Bahadur Shastri Birth Anniversary : भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती; वाचा त्यांचा जीवनप्रवास
Lal Bahadur Shastri Birth Anniversary : लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद आणि रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी झाला.
Lal Bahadur Shastri Birth Anniversary : लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद आणि रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात झाला. लालबहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून 1964 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात 1965 सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.
बालपणीच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव
वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले आणि त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले. 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. 1928 साली लाला लजपतराय गेले आणि पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली.
राजकीय जीवन
उत्तर प्रदेश विधान सभेवर ते काँग्रेसतर्फे 1946 मध्ये निवडून आले. गोविंद पंतांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृह आणि दळणवळण खाते देण्यात आले. पंडित नेहरूंनी त्यांना अ. भा. काँग्रेसचे महासचिव केले (1950). 1952 च्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीचे कठीण काम केले. त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि संघटनकौशल्य लक्षात घेऊन पंडित नेहरूंनी त्यांना राज्यसभेचे सभासद करून केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि वाहतूक खात्याचे मंत्री केले. 1955 मध्ये त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या उतारूंसाठी अनेक सुखसोयी उपलब्ध करून देऊन गंगा नदीवर मोठा पूल बांधला. 1956 मध्ये प. बंगालमध्ये चित्तरंजन कारखान्याची उभारणी केली. यावेळी केरळमध्ये घडलेल्या अरियालूरच्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आदर्श घालून दिला.
इतर देशांशी मैत्रीचे संबंध
भारताचे शांतता आणि अलिप्तता या तत्त्वांवर आधारित परराष्ट्रधोरण पुढे चालू ठेवले. श्रीलंका, भूतान, नेपाळ यांसारख्या शेजारी देशांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्याशी असलेली मैत्री दृढ करण्यावर भर दिला. भारत श्रीलंका यांत करार करून सु. चार लाख भारतीय तमिळांना श्रीलंकेचे नागरिकत्व मिळवून दिले. शेख अब्दुल्लांना त्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांमुळे स्थानबद्ध केले. त्याचप्रमाणे नेहरूंचे औद्योगिक प्रगतीचे धोरणही त्यांनी पुढे चालू ठेवले.
भारत-पाकिस्तान युद्ध
त्यांच्या कारकीर्दीतील भारत-पाक युद्ध ही सर्वांत कसोटीची घटना होती. ती त्यांनी अत्यंत खंबीरपणे आणि कार्यक्षमतेने हाताळली. यांच्या कार्यकाळात 1965 सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी, इ.स. 1966 रोजी त्यांचा आकस्मित मृत्यू झाला.