(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kochi Water Metro: आता पाण्यावरही धावणार मेट्रो! कोठे होणार सुरु अन् तिकीटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Kochi Water Metro: देशातील पहिली वॉटर मेट्रो केरळमधील कोचीमध्ये सुरु होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी 25 एप्रिल रोजी (मंगळवारी) तिरुवनंतपुरम येथून या सेवेचे उद्घाटन करणार आहेत.
Kochi Water Metro : पश्चिम बंगालमध्ये मेट्रो (Metro) पाण्याखाली धावण्यासाठी सज्ज असतानाच आता निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या केरळमध्ये पाण्यावरुन मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिला वाॅटर मेट्रोचे लोकार्पण करणार आहेत. देशातील पहिली वॉटर मेट्रो केरळमधील कोचीमध्ये सुरु होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी 25 एप्रिल रोजी (मंगळवारी) तिरुवनंतपुरम येथून या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा केरळचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे देशात प्रथमच सेवेत येत असलेली वॉटर मेट्रो म्हणजे काय? प्रवास कसा करता येईल? त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
कोचीच्या आसपास असलेली 10 बेटे जोडली जाणार
कोची वॉटर मेट्रो पोर्ट सिटीसाठी तब्बल 1 हजार 136 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत कोचीच्या आसपास असलेली 10 बेटे जोडली जाणार आहेत. यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या हायब्रीड बोटींचा वापर करण्यात येणार आहे. या बोटींमध्ये प्रगत तंत्रज्ञान असेल. तसेच ते पर्यावरणपूरक असेल. केरळ वॉटर मेट्रोने पूर्णपणे वातानुकूलित, इको-फ्रेंडली असण्यासोबतच दिव्यांगांच्या सुविधांची सुद्धा काळजी घेतली आहे.
या मार्गावर मेट्रो सुरु होईल
वॉटर मेट्रो प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल असतील. या प्रकल्पाला केरळ सरकार आणि KFW कडून निधी देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल ते विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वाॅटर मेट्रो सुरु होईल. मिळालेल्या माहितीनुसार, वायपिन ते हायकोर्ट हे अंतर 20 मिनिटांत तर विट्टीला ते कक्कनड हे अंतर 25 मिनिटांत गाठता येणार आहे. सुरुवातीला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत वॉटर मेट्रो धावणार आहे. पिक अवर्समध्ये (सर्वाधिक व्यग्र वेळेमध्ये) दर 15 मिनिटांनी सेवा उपलब्ध असेल.
कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रोसाठी समान कार्ड
विशेष म्हणजे कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो दोन्ही एकाच कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना कोची-1 कार्ड वापरावे लागणार आहे. तसेच, ते डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करु शकतात. वॉटर मेट्रोमध्ये एकवेळ प्रवासाच्या तिकिटांसोबतच साप्ताहिक, मासिक आणि तीन महिन्यांच्या पासचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
सवलत पास देखील मिळणार
वॉटर मेट्रोमध्ये डिस्काऊंट पासची सुविधाही देण्यात आली आहे. साप्ताहिक पास 180 रुपये आहे. यामधून 12 वेळा प्रवास करता येईल. 50 वेळा प्रवासासह 30 दिवसांच्या पासची किंमत 600 रुपये आहे, तर 150 वेळा प्रवासासह 90 दिवसांच्या पासची किंमत 1500 रुपये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या