Kisan Mahapanchayat : शेतकरी संघटनांची जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात महापंचायत; दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली
Kisan Mahapanchayat : शेतकरी संघटनांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर महापंचायत बोलावली आहे. या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
Kisan Mahapanchayat : दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकरी संघटनांनी महापंचायत (Kisan Mahapanchayat) बोलावली आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने शेतकरी संघटना नाराज असून त्याविरोधात ही महापंचायत बोलवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी नाकारली आहे. शेतकऱ्यांची महापंचायत लक्षात घेता दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे वरील गाजीपूर सीमेजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीबाहेरील शेतकऱ्यांना अटकाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून पावले उचलली जात असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने हमी भावाच्या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात अनेक शेतकरी संघटना या किसान महापंचायतीत सहभागी होणार आहेत. ही महापंचायत आज सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. महापंचायत आणि धरणे आंदोलन असे स्वरुप असणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने ही जंतरमंतरवर केली जातात.
दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवरून शेतकरी राजधानी दिल्लीत दाखल होऊ नये यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सीमेवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. या आधीच दिल्लीत दाखल झालेले शेतकरी या महापंचायतीत सहभागी होऊ शकतात. मात्र, आज दिल्लीत कोणत्याही शेतकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकरी महापंचायतीत मोठी गर्दी उसळणार असल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Delhi | Security increased at Ghazipur border on the Delhi-Meerut expressway ahead of the call given by farmers to protest at Jantar Mantar today pic.twitter.com/mSSMGvfiD5
— ANI (@ANI) August 22, 2022
किसान महापंचायतीत कोणते मुद्दे?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमधील पीडित शेतकरी कुटुंबाला न्याय देणे, लखीमपूर खीरीमधील घटनेच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेन यांना अटक करा, आंदोलनादरम्यान अटक केलेल्या शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका करणे, आदी मागण्यांसाठी ही महापंचायत बोलवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा अजूनही तुरुंगात आहे. आशिष मिश्राच्या कारने काही आंदोलक शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याचा आरोप आहे.
त्याशिवाय, शेतकरी संघटनांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमी भाव कायदा तयार करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, विज कायदा विधेयक रद्द करा, ऊसाच्या एफआरपीत वाढ करावी, आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अग्निपथ योजनेला विरोध आदी मुद्यांवर ही महापंचायत पार पडत आहे.