पुढील 3 आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता : आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज
कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील 3 आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Kerala Covid-19 situation : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील 3 आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा देखील दिला आहे. गेल्या 24 तासात दिल्ली, मुंबई आणि कोलकाताध्ये काही प्रमाणात रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोना टेस्टींगचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या स्थिर होऊ शकते अशीही शक्यता सांगण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या दोन लाटांमध्ये केरळला मोठा फटका बसला होता. यावेळी केरळध्ये कोरोनाची लाट फारशी चिंता वाढवणारी नाही. मात्र, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी सांगितले की, पुढील तीन आठवड्यामध्ये केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. राज्यात कोविड क्लस्टरची संख्या वाढत आहे. राज्यात विषाणूचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे. दररोज, कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्यात कोरोनाबरोबर ओमायक्रॉनचे रग्ण देखील आहेत.
देशातील मेट्रो शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कुठे स्थिर तर कुठे वाढताना दिसत आहे. तर देशातील काही शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि दिल्लीमध्ये शनिवारी दैनंदीन रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर कोलकातामध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीतशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत शनिवारी 20 हजार 718 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पॉझिटीव्हीटी रेट हा 30.64 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून 24 तासांत होणाऱ्या चाचण्यांची संख्या देखील कमी झाली आहे. यासंदर्भात बोलताना दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, येत्या काही दिवसात दिल्लीत रुग्णांची संख्या कमी होणार आहे. दरम्यान, डिसेंबरपासूनच दिल्लीमध्ये ओमायक्रॉन पसरत असल्याचे ओमायक्रॉनच्या प्रसाराचा अभ्यास करणार्या अहवालात म्हटले आहे.
कोरोना रुग्णसंख्येबाबत महाराष्ट्राचा विचार केला तर शनिवारी राज्यात 42 हजार 462 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 10 हजार 662 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या कोणतेही नवीन निर्बंध आणले जाणार नाहीत. परंतू परिस्थितीनुसार पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. लोकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच दिल्ली, मुंबईचा घसरलेला कल बेंगळुरूमध्येही दिसून आला आहे. जरी बेंगळुरूमध्ये सुमारे 22,000 नवीन संसर्गाची नोंद झाली आहे.