(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kerala Boat Tragedy : केरळमधील दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं?
Kerala Boat Tragedy : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात हाऊसबोट पलटी होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Kerala Boat Tragedy : केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट (HouseBoat) पलटी होऊन 22 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 22 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी काही जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे.
नक्की काय घडलं?
केरळमधील तनूर परिसरातील तुवाल्थीराम समुद्रकिनाऱ्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या बोटीला सुरक्षा प्रमाणपत्रही नव्हते.प्रवाशांना सुरक्षाकवचही देण्यात आले नाहीत. पर्यटक बोटींसाठी अनिवार्य असलेले सुरक्षा प्रमाणपत्र या बोटीला देण्यात आले नव्हते. याशिवाय, सूर्यास्तानंतर बोटीच्या प्रवासावर बंदी असतानाही ही बोट रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पाण्यात होती. पोलिसांनी सांगितले की, बोटीच्या मालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तज्ञांकडून आधीच देण्यात आला होता इशारा?
केरळमध्ये घडलेल्या या घटनेचा हवामान तज्ञांकडून आधीच इशारा देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ.मुरली थुम्मारुकुडी यांनी गेल्या महिन्यात सूचक वक्तव्य केले होते. डॉ.मुरली थुम्मारुकुडी हे युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी 1 एप्रिल रोजी एक पोस्ट लिहली होती. या पोस्टमध्ये त्यांनी हाऊसबोटच्या कंपन्यांना केरळच्या बॅकवॉटर बद्दल खबरदारीचा इशारा दिला होता. तसेच हा इशारा त्यांनी केरळच्या बॅकवॉटरमधील सर्व बोटींना दिला होता. ही कोणतीही भविष्यवाणी नव्हती, तर वातावरण बदलामुळे केरळच्या बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या हालचाली लक्षात घेऊन त्यांनी हा इशारा दिला होता. तसेच 'अगदी थोडा बेजबाबदारपणा देखील मोठा अपघात घडवून आणू शकतो' असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. यासोबतच त्यांनी ट्वीट करुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची भरपाईल दिली जाईल.
Pained by the loss of lives due to the boat mishap in Malappuram, Kerala. Condolences to the bereaved families. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be provided to the next of kin of each deceased: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :