Ramesh Jarkiholi Resigns | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा
बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे.
बेळगाव : कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिला आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे. युवतीला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केला होता. शिवाय रमेश जारकीहोळी यांचे काही अश्लील व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
रमेश जारकीहोळी यांनी आपलं राजीनामा पत्र त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे पाठवून दिलं आहे. "माझ्यावरील आरोपात कोणतंही तथ्य नाही. पण नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. माझा राजीनामा स्वीकारावा," असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे. रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा द्यावा म्हणून काँग्रेसने राज्यात आंदोलन केलं होतं.
Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल
रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.
दिनेश कलहळ्ळी यांनी काल (2 मार्च) शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. आपल्या तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे की, "रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं." तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी कलहळ्ळी यांनी केली.
दरम्यान रमेश जारकीहोळी हे कर्नाटकातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. पूर्वी काँग्रेसचे नेते असलेल्या जरकीहोळी यांचा कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु आता जारकीहोळी यांच्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.