Karnataka New Chief Minister: ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार यांना 'हे' पद, शनिवारी शपथविधी
Karnataka New Chief Minister: सिद्धरमय्याच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, कर्नाटकातील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी पार पडणार.
Karnataka New Chief Minister: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याचा पेच अखेर सुटला असल्याचं बोललं जात आहे. सिद्धरमय्या (Siddaramaiah) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि डीके शिवकुमार यांना (DK Shivakumar) उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्याची माहिती मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं. शनिवारी (20 मे) बंगळुरूत कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, अडीच वर्षांनी डिके शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसनं ठरवल्याचं कळतंय. सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.
आज संध्याकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक
सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी 7 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (17 मे) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.
त्यानंतर बुधवारी रात्री शिवकुमार यांनी सुरजेवाला यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धरामय्या यांनीही रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली.
कर्नाटकात काँग्रेसची सरशी, तर भाजपचा दारुण पराभव
कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसनं 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप 66 जागा आणि जेडीएस 19 जागांवर घसरले. 13 मे रोजी (शनिवारी) राज्यात निकाल लागला. तेव्हापासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न कायम होता.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) रविवारी संध्याकाळी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून विधीमंडळ पक्षनेते निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. यानंतर आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी बंगळुरूला पाठवलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया हे तीन निरीक्षक सोमवारी दिल्लीत परतले. या नेत्यांनी आमदारांची मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही घेतलं.