Karnataka: कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला? 'या' नेत्यामागे दुप्पट आमदार असल्याची सूत्रांची माहिती, आजच होणार घोषणा...
Karnataka Election Result 2023: कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आले आहेत.
Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय नोंदवून भाजपला सत्तेतून हद्दपार केले असले तरी मुख्यमंत्री पदाबाबत पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार यांची नावं चर्चेत असून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. सिद्धारमय्या यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे पारडं जड असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्यात आले आहेत. आमदारांशी चर्चा केल्यानंतर बहुतांशी आमदार हे सिद्धारमय्या यांच्यामागे असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिद्धारमय्या हे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. तशी घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस निरीक्षकांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावर आमदारांच्या मताचा अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम निर्णय घेण्यासाठी खर्गे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाईल.
कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. या तिन्ही पर्यवेक्षकांना रविवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी स्वतंत्रपणे बोलून त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही करण्यात आले आहे. हे तिन्ही निरीक्षक सोमवारी सायंकाळी खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत पोहोचले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे देखील सोमवारी दिल्लीला जाणार होते. परंतु पोटाच्या संसर्गामुळे त्यांनी आपला प्रस्तावित दौरा रद्द केला. डीके शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने त्यांना सिद्धरामय्या यांच्यासह दिल्लीला बोलावले होते. मला पोटात संसर्ग झाला आहे आणि सोमवारी दिल्लीला जाता आले नाही. आज दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करेन, मी हा निर्णय पक्षप्रमुखांवर सोडला आहे. शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश सोमवारी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
डीके शिवकुमार यांनीही सोमवारी त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा केला. ते म्हणाले की, 10 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दणदणीत विजय ही त्यांच्या वाढदिवशी जनतेने त्यांना दिलेली सर्वोत्तम भेट होती. माझे आयुष्य कर्नाटकातील जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे असंही ते म्हणाले.
डीके शिवकुमार म्हणाले की, आम्ही एक ओळीचा ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये आम्ही हा मुद्दा पक्षाच्या अध्यक्षांवर सोडू असे म्हटले आहे. मी इतरांसोबत संख्याबळावर बोलू शकत नाही, पण 135 आमदार ही माझी ताकद आहे. माझ्या अध्यक्षतेखाली पक्षाने कर्नाटकात डबल इंजिन सरकार, भ्रष्ट सरकारच्या विरोधात 135 जागा जिंकल्या. जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन 135 जागांवर विजयी केले.
डीके शिवकुमार म्हणाले की, कर्नाटकमधील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे आणि एकजुटीचे देशभरातून कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवरून अधिक पाठिंबा मिळाला असता तर आम्ही इतरत्र चांगली कामगिरी करू शकलो असतो आणि जागांची संख्या वाढवू शकलो असतो. मात्र, तरीही आम्ही आनंदी आहोत.
224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांवर दणदणीत विजय नोंदवला. तर भाजपने 66 तर जेडीएसने 19 जागा जिंकल्या आहेत. 13 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे.