Karnataka Election 2023 : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर, माजी मुख्यमंत्री शेट्टर हुबळी-धारवाड मध्यमधून रिंगणात
Karnataka Election : काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Karnataka Election : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाकमधील (Karnataka Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असाच सामना होत आहे. दरम्यान, काँग्रेसने निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर ( (Jagadish Shettar) यांचाही समावेश आहे. त्यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.
काँग्रेसने मंगळवारी आपल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते सहा वेळा या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. या जागेवरुन भाजपने महेश तेंगीनाकई यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसनं आता फक्त आठ जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे.
भाजपने माझा अपमान केला, जगदीश शेट्टर यांचा आरोप
जगदीश शेट्टर यांनी भाजपकडे तिकीट देण्याची मागणी केली होती, मात्र भाजपने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला होता. त्यानंतर सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के सी वेणुगोपाल, रणदीप सिंग सुरजेवाला (कर्नाटक प्रभारी), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने अपमान केल्याचा आरोप शेट्टर यांनी केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करुन मी आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करत आहे. शेट्टर हे अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांनी बीएस येडियुरप्पा आणि दिवंगत एचएन अनंत कुमार यांच्यासोबत कर्नाटकात, विशेषतः उत्तर कर्नाटक प्रदेशात भाजपची स्थापना केली. भाजपने मला अनेक पदे दिली, त्या बदल्यात मी एका कटिबद्ध आणि निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे पक्ष बांधणीसाठी काम केले. सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याचे शेट्टर म्हणाले.
शेट्टर हे लिंगायत समाजातील नेते
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे कर्नाटकातील प्रभावशाली लिंगायत समाजातील नेते आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 18 टक्के लिंगायत समाज उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये केंद्रीत आहे. हा समाज भाजपची मोठी व्होट बँक आहे. शेट्टर आता काँग्रेसमध्ये आल्यानं त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
एक-दोन लिंगायत नेते भाजपमधून बाहेर पडल्याने कोणताही परिणाम नाही : बोम्मई
निवडणुकीपूर्वी एक-दोन लिंगायत नेते भाजपमधून बाहेर पडल्याने कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री आणि लिंगायत नेते बसवराज बोम्मई म्हणाले. ज्या भागातील नेत्यांनी पक्ष सोडला आहे, त्या भागात भाजप गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळं कार्यकर्ते त्यांचा पराभव करुन त्यांना धडा शिकवतील असे भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह म्हणाले.
10 मे रोजी मतदान
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. कर्नाटकाच्या राजकारणात लिंगायत आणि वोक्कालिंग समाजाचा दबदबा आहे. लिंगायत समाजाची 18 टक्के लोकसंख्या आणि वोक्कलिंग समाजाची 14 टक्के लोकसंख्या ही राजकारणात परिणामकारक ठरतेय. या दोन्ही समाजाची मतं आपल्याच पारड्यात पडावी यासाठी सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे.
काँग्रेसचे सात उमेदवार कोणते ?
जगदीश शेट्टर - हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ
दुर्गाप्पा एस. हुलागेरी - लिंगसुगुर
दीपक चिंचोरे - हुबळी-धारवाड-पश्चिम
मोहम्मद युसूफ सावनूर - शिगाव
नंदागावी श्रीनिवास - हरिहर
एच.डी. थम्मय्या - चिकमंगळूर
M.A. गोपालस्वामी - श्रवणबेळगोळ
महत्त्वाच्या बातम्या: