Siddaramaiah on Pakistan : कर्नाटक सीएम सिद्धरामय्यांची पाकिस्तानी मीडियात थेट हेडलाईन; भाजपचा टोला, यांना पाकिस्तान रत्न द्या; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सिद्धरामय्या यांचे वर्णन "पाकिस्तान रत्न" असे केले. ते म्हणाले, " हास्यास्पद विधानांमुळे तुम्ही एका रात्रीत पाकिस्तानात जगप्रसिद्ध झाला आहात."

Siddaramaiah on Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील राजकीय वातावरणही तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच म्हटले होते की ते पाकिस्तानसोबत युद्धाच्या बाजूने नाहीत. त्यांचा या विधानाचा पाकिस्तानी मीडियात हेडलाईन करून पुरेपूर वापर करण्यात आला. आता त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिल्यानंतर, भाजपने त्यांना टोमणे मारले आहेत आणि त्यांना पाकिस्तान रत्न म्हटले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "युद्धाबद्दलच्या माझ्या विधानाच्या बाजूने आणि विरोधात मी वादविवाद आणि चर्चा पाहिल्या आहेत. युद्ध हा नेहमीच राष्ट्राचा शेवटचा पर्याय असला पाहिजे. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने आपल्या देशातील जनतेला आणि केंद्र सरकारला हे स्पष्ट केले आहे की आपल्या गुप्तचर आणि सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहेत. आता सरकारची ही गंभीर जबाबदारी आहे की प्रथम या त्रुटी दूर कराव्यात आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करावी."
ते म्हणाले, "या महत्त्वाच्या क्षणी, जगभरातील देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध करत भारतासोबत खंबीरपणे उभे आहेत. आपण या अभूतपूर्व जागतिक पाठिंब्याचा फायदा घेतला पाहिजे आणि पाकिस्तानला इतका खोल धडा शिकवला पाहिजे की ते पुन्हा कधीही अशा बेपर्वा कृत्यांचे धाडस करू नये."
सिद्धरामय्या यांचे विधान पाकिस्तानात हेडलाईन का झाली?
यापूर्वी सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची गरज नाही असे सांगून वाद निर्माण केला होता. "कठोर सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत. आम्ही युद्ध पुकारण्याच्या बाजूने नाही. शांतता असली पाहिजे, लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि केंद्र सरकारने प्रभावी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी," असे त्यांनी काल सांगितले. यानंतर, पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजसह पाकिस्तानी माध्यमांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या टिप्पण्या कव्हर केल्या आणि त्यांना "भारतातील युद्धाविरुद्धचा आवाज" असे वर्णन केले.
I have observed the debates and discussions, both for and against, surrounding the statement I made about war.
— Siddaramaiah (@siddaramaiah) April 27, 2025
War should always be a nation's last resort — never the first, nor the only option. Only when every other means to defeat the enemy has failed, should a country be…
भाजपने सिद्धरामय्या यांची खिल्ली उडवली
कर्नाटक भाजपचे प्रमुख बी.वाय. विजयेंद्र यांनी जिओ न्यूज बुलेटिनची एक क्लिप शेअर केली आणि X वर लिहिले, "सीमेपलीकडून वज्र-ए-आला सिद्धरामय्या यांचे खूप खूप अभिनंदन! पाकिस्तानी मीडिया सिद्धरामय्या यांचे खूप कौतुक करत आहे आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धाविरुद्धच्या त्यांच्या टिप्पण्यांसाठी भाजप आणि इतरांकडून त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ते स्पष्टपणे निराश आहेत." देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करताना श्री. विजयेंद्र म्हणाले, "नेहरूंना रावळपिंडीच्या रस्त्यांवर उघड्या जीपमधून फिरवण्यात आले कारण पाकिस्तान सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल नेहरूंवर खूप खूश होता, जे पाकिस्तानच्या बाजूने होते. सिद्धरामय्या हे पुढचे भारतीय राजकारणी असतील ज्यांना पाकिस्तानात उघड्या जीपमधून फिरवण्यात येईल का?"
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सिद्धरामय्या यांचे वर्णन "पाकिस्तान रत्न" असे केले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तुमच्या बालिश आणि हास्यास्पद विधानांमुळे तुम्ही एका रात्रीत पाकिस्तानात जगप्रसिद्ध झाला आहात."
इतर महत्वाच्या बातम्या























