(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BS Yediyurappa Resign : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून राजकीय वर्तुळात येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु होत्या.
कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान येडियुरप्पा यांच्याकडून काढून घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत होत्या. अखेर आज येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेटही घेतली होती. अशातच एएनआय या वृत्तसंस्थेनं काही वेळापूर्वी आज दुपारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती.
2023 मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं सध्याचं वय लक्षात घेत नेतृत्त्वबदल करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडनं घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला असल्याचं बोललं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या वृत्ताबाबत बोलताना मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नकार दिला होता. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं होतं. पण अखेर आज त्यांनी राजीनामा दिला.
एबीपी न्यूजच्या सूत्रांच्या माहितीनुसार, वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळं येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज येडियुरप्पा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीतही येडियुरप्पांनी राजीनाम्याचा मुद्दा काढला. त्यानंतर भाजप हायकमांडनं त्यांना आश्वस्त केलं आहे की, लवकरच कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल. लवकरच विधिमंडळ गटनेत्यांची बैठक होईल तोवर येडियुरप्पा मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण होणार कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री?
जर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर त्यांनी राजीनामा दिला तर लगेच नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल. येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढं असलेलं नाव आहे प्रल्हाद जोशी यांचं. प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकमधून खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यासह बीएल संतोष यांचंही नाव चर्चेत आहे. बीएल संतोष बऱ्याच वर्षांपासून भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावं देखील चर्चेत आहेत.