कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केलं
सध्या कर्नाटक विधानसभेत एकूण 225 आमदार आहेत. त्यापैकी 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर आता विधानसभेत आमदारांची संख्या 207 वर आली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची आवश्यकता होती.
बंगळुरु : कर्नाटकात बहुतम सिद्ध करण्यात भाजपच्या बी एस येडियुरप्पा यांना यश आलं आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केलं. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी संध्याकाळी चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
येडियुरप्पा यांच्या सरकारला 106 आमदारांनी पाठिंबा दिला. तर 100 आमदारांनी विरोध केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरवल्याने येडियुरप्पा यांचा मार्ग आणखी सोपा झाला होता. आज मतदान झालं असतं तरी येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला असता.
सध्या कर्नाटक विधानसभेत एकूण 225 आमदार आहेत. त्यापैकी 17 आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर विधानसभेत आमदारांची संख्या 207 वर आली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची आवश्यकता होती. कुमारस्वामी सरकारला बहुमत चाचणीत केवळ 99 मतं मिळाली होती. तर भाजपला 105 मतं मिळाली होती. मात्र आता कर्नाटक विधानसभेत भाजपचा आकडा 106 वर गेला आहे.
विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी 25 जुलै रोजी 3 बंडखोर आमदार आर शंकर, रमेश जर्कीहोली, महेश कुमठल्ली यांना अपात्र ठरवलं होतं. त्यानंतर रविवार आणखी 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. यामध्ये आनंद सिंह, प्रताप गौडा पाटील, बीसी पाटील, शिवराम हेब्बार, एस टी सोमशेखर, बायरती बसवराज, रोशन बैग, मुनीरतना, के सुधाकर, एमटीबी नागराज, श्रीमंत पाटील, ए एच विश्वनाथ, नारायण गौड़ा, के गोपलाईया या आमदारांचा समावेश आहे. अपात्र घोषित केलेल्या 17 आमदारांमध्ये 13 काँग्रेस, जेडीएसचे 3 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.
संबंधित बातम्या