(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kapil Sibal : कपिल सिब्बल यांनी सोडला काँग्रेसचा हात; समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी
Kapil Sibal : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Kapil Sibal : काँग्रेस आणि पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाला राम राम केला आहे. कपिल सिब्बल समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जी-23 गटातून एक नेता पक्षाबाहेर पडला आहे. कपिल सिबल यांनी 16 मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती दिली.
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने डिंपल यादव, जावेद अली खान आणि कपिल सिब्बल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कपिल सिबल हे उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या कोट्यातून खासदार आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सिबल यांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी केली असल्याची चर्चा सुरू होती.
कपिल सिबल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ज्ञदेखील आहेत. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी सु्प्रीम कोर्टात लढवले आहेत. सिबल यांनी समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या नेत्यांचे खटले सिबल यांच्याकडे आहेत.
समाजवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते आझम खान यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवून देण्यात सिबल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आझम खान यांचा खटला सिबल यांनी लढवला होता. त्याशिवाय, नॅशनल हेराल्ड खटल्यात राहुल गांधी यांच्यावतीने ते बाजू मांडत आहेत.
कपिल सिबल हे 2004 ते 20114 या दरम्यान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. दिल्लीतून त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.
राज्यसभेच्या 10 जागांसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग
देशभरात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळणार आहे. यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन जागा, झारखंड, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका जागेवर विजय मिळू शकतो. या 10 जागांसाठी काँग्रेसमधील अनेकजण इच्छुक आहेत.