(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 Vaccine | देशासह जगात प्रभावीपणे लस पोचविण्यासाठी वचनबद्ध, सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक यांचं संयुक्त निवेदन
सीरम इंस्टीट्यूटचे अदार पूनावाला आणि भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी लसीची गरज आहे. ती लोकांपर्यंत होचवण्याची प्रभावी तयारी सुरू आहे.
मुंबई : देशात ज्या दोन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या प्रमुखांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. पुण्याची सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी भारत आणि जगात लस प्रभावी आणि सुरक्षितपणे देण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लस आवश्यक
या लसीवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, आज जगाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लस आवश्यक आहे. या दोन्ही कंपन्या सुरक्षित आणि परिणामकारक लस लोकांपर्यंत पोहचवतील याची खात्री आहे. त्यासाठी उच्च प्रतीची पुरवठा व वितरण करण्याची तयारी चालू आहे.