(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jodhpur Communal Violence : जोधपूर हिंसाचारावरुन भाजप अध्यक्ष सतीश पुनिया यांचं राज्यपालांना पत्र, घटनेची चौकशी करण्याची मागणी
जोधपूर जातीय हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना पत्र लिहले आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Jodhpur Communal Violence : राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी जोधपूर जातीय हिंसाचाराच्या मुद्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा (Kalraj Mishra) यांना पत्र लिहले आहे. याबाबत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सूचना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जोधपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 97 जणांना अटक करण्यात आली असून, भाजपने राज्यपालांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सतीश पुनिया यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात जोधपूरमधील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याची तुम्हाला नम्र विनंती करतो असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी आणि राजस्थानमध्ये जातीय घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारला आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात. तसेच या घटनेत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस सरकार राजस्थानमध्ये चुकीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हे मोठे आव्हान आहे. काँग्रेसच्या राजकारणामुळेच राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे, जी खरोखरच चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या खुर्चीची चिंता करण्यापेक्षा राज्यातील जनतेची चिंता करावी, असे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
हिंसाचाराला भाजप जबाबदार : काँग्रेस
काँग्रेसने जोधपूरमधील हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि त्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचे राज्य सरकारचे मंत्री प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, राजस्थानमध्ये मंदिर आणि मशिदीमध्ये कोणताही वाद नाही. येथे लाऊडस्पीकर आणि बुलडोझरचा वाद नाही. धर्माचा विचार न करता गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही मंत्री प्रताप सिंह म्हणाले. दरम्यान, जोधपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 97 जणांना अटक केली आहे. याशिवाय या घटनेनंतर जिल्ह्यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच 10 पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे.