नरेंद्र मोदी आणि अमित शाह मला आवडत नाहीत : जावेद अख्तर
बुरखा बंदीबाबत कायदा केला जाणार असेल तर, राजस्थानातील महिलांची पदर घेण्याची प्रथेवरही बंदी आणली पाहिजे, असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.

नवी दिल्ली : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारीवरुन भाजपवर टीकास्र सोडलं आहे. भोपाळमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. भाजपने भोपाळच्या जनतेला काय समजलं आहे, की त्यांनी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिली. या उमेदवारीवरून भाजपची मानसिकता समोर येत आहे. देशात याआधी अनेक निवडणुका झाल्या, मात्र ही निवडणूक देशाची दिशा निश्चित करणारी निवडणूक आहे, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह मला आवडत नाहीत, असं रोखठोक मत जावेद अख्तर यांनी मांडलं. शिवसनेचं मुखपत्र सामनातून केलेल्या बुरखा बंदीच्या मागणीचाही जावेद अख्तर यांनी समाचार घेतला. जावेद अख्तर यांनी म्हटलं की, बुरख्यावर बंदी आणली पाहिजे आणि डोक्यावर पदर घेण्याची प्रथाही थांबवली पाहिजे. बुरखा बंदीबाबत कायदा केला जाणार असेल तर, राजस्थानातील महिलांची पदर घेण्याच्या प्रथेवरही बंदी आणली पाहिजे, असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.
भाजपची अशी विचारधारा आहे की तुम्ही त्यांना विरोध केला तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. प्रज्ञा ठाकूर यांच्या शापाने हेमंत करकरे यांच्या सारखे देशभक्त अधिकारी शहीद होत असतील तर त्यांनी या शापाचा देशाच्या हितासाठी वापर करावा, असा टोला जावेद अख्तर यांनी लगावला.
माझा मोदीजींना सल्ला आहे की त्यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या शापाचा वापर हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांविरोधात करावा. भाजपने प्रज्ञासिंह यांना उमेदवारी जाहीर करुन स्वत:चा पराभव स्वीकारला असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं.
























