![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये तीन तासांत दुसरा हल्ला, एक पोलीस शहीद, तीन जखमी
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर तीन तासांत दोन ठिकाणी हल्ले केले. श्रीनगरच्या सौरा येथील आंचर भागात दहशतवाद्यांनी एका जवानाची गोळ्या झाडून हत्या केली.
![Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये तीन तासांत दुसरा हल्ला, एक पोलीस शहीद, तीन जखमी jammu kashmir terrorist attack in soura and kulgam one policeman killed Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये तीन तासांत दुसरा हल्ला, एक पोलीस शहीद, तीन जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/28ec733eecb55c828de92ab4aecda967_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी तीन तासांत दोन ठिकाणी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले केले. श्रीनगरच्या सौरा येथील आंचर भागात दहशतवाद्यांनी एका जवानाची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात शहीद जवानाची नऊ वर्षांची मुलगी या हल्ल्यात जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह कादरी असे मृत जवानाचे नाव असून मलिक साब परिसरात त्यांच्या घरी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सैफुल्लाह कादरी आणि त्यांच्या मुलीला तातडीने SKIMS रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, कॉन्स्टेबलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उजव्या हाताला गोळी लागल्याने जखमी झालेल्या त्याच्या मुलीवर उपचार सुरू असून सध्या ती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
दुसऱ्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी कुलगामच्या यारीपोरा पोलीस स्टेशन परिसरात ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडचा भिंतीवर स्फोट झाला. या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सौरा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून हा हल्ला गझेल पथकाने केला आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानाला लक्ष्य केले असल्याचा दावा केला आहे. लवकरच आणखी हल्ले केले जातील असे सांगून लष्कर फ्रंट-टीआरएफने अनेक हल्ल्यांची धमकी दिली आहे.
सौरा भागात या दिवसातील हा दुसरा हल्ला आहे. 7 मे रोजी आजच्या हल्ल्याच्या ठिकाणापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आयवा पुलावर TRF दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचारी गुलाम हसन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. पुलवामा जिल्ह्यात 13 मे रोजी पोलीस शिपाई रियाझ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर सैफुल्ला हे मे महिन्यात शहीद झालेले तिसरे पोलीस कर्मचारी आहेत.
शहीद पोलीस कर्मचारी सैफुल्ला कादरी यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रद्धांजली वाहिली. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, दहशतवाद्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दहशतवाद्यांनी नऊ वर्षांच्या मुलीवर देखील गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)