(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Jail Rule Changed : IAS अधिकाऱ्याच्या हत्येतील आरोपीची सुटका चुकीची; माजी खासदाराच्या सुटकेवर IAS संघटनेची प्रतिक्रिया
Bihar Jail Rule Changed : ' कर्तव्यावर असलेल्या सरकारी सेवकाच्या हत्येतील दोषीला कमी आरोपाच्या श्रेणीत वर्ग केले जाऊ शकत नाही. नियमांतील असे बदल हा एक अन्याय असल्याची प्रतिक्रिया IAS असोसिएशनने दिली आहे.
Bihar Jail Rule Changed : अनुसूचित जातीमधील आयएएस (IAS) अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुंड-राजकारणी आनंद मोहन सिंह (Anand Mohan Singh) याच्या सुटकेचे निर्देश बिहार सरकारने दिले आहेत. माजी खासदाराची सुटका करण्यासाठी बिहारमधील नियमांमध्ये झालेल्या बदलाविरोधात देशातील विविध संघटना, संस्थांनी जोरदार निषेध केला आहे, काही संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सेंट्रल आयएएस (IAS) असोसिएशनने बिहार सरकारच्या निर्णयाविरोधात ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. "अशा सौम्य निर्णयांमुळे न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, सार्वजनिक सेवकांचे मनोधैर्य खचते, कायदा-सुव्यवस्था बिघडते आणि न्याय प्रशासनाची थट्टा होते" असे सेंट्रल आयएएस (IAS) असोसिएशनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
The Central IAS Association expresses its deep dismay at the decision of the State Government of Bihar to release the convicts of the brutal killing of Late Shri G Krishnaiah, IAS, former District Magistrate of Gopalganj, by a change in classification rules of prisoners. pic.twitter.com/a84s7pYL20
— IAS Association (@IASassociation) April 25, 2023
"कैद्यांच्या सुटकेच्या नियमांत असे बदल करणे अयोग्य आहे. गोपालगंजचे माजी जिल्हा दंडाधिकारी, IAS, दिवंगत जी. कृष्णैय्या यांच्या निर्घृण हत्येतील दोषींना मुक्त करण्याच्या बिहार राज्य सरकारच्या निर्णयावर केंद्रीय IAS संघटना तीव्र नाराजी व्यक्त करते," असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे.
माजी खासदार आनंद मोहन सिंह (राजपूत) हे निवडणुकांपूर्वी सुटका होणार्या 27 आरोपींमधील एक आहेत. आनंद मोहन सिंह याला राजपूत समाजाचा मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजपूत समाजाची मते मिळवण्यासाठी हा बिहार सरकारचा निर्णय असू शकतो, अशी चर्चा आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहार सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावेळी ते म्हणाले, आनंद मोहन हा या प्रकरणात "बळीचा बकरा" बनला आहे आणि बर्याच दिवसांपासून तुरुंगात राहिला असल्याचे त्यांनी म्हटले.
1994 मध्ये, गोपालगंजचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी, IAS, जी. कृष्णैय्या यांना आनंद मोहन सिंहच्या चिथावणीखोर जमावाने ठार मारले होते. जमावाने जी. कृष्णैय्या यांना त्यांच्या गाडीतून बाहेर ओढून मारले होते. आनंद मोहन सिंह हा राष्ट्रीय जनता दलाचा नेता होता. त्याच्या पक्षातील एका बाहुबली नेत्याची हत्या झाली होती. त्यावेळी या हत्येचा निषेध जमाव करत होता. त्यावेळी आनंद मोहन सिंह याच्या चिथावणीनंतर जमावाने आयएएस जी. कृष्णैय्या यांची हत्या केली.
लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राजदचा माजी खासदार आनंद मोहन सिंह याला 2007 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु पाटणा उच्च न्यायालयाने नंतर शिक्षा जन्मठेपेत बदलली, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. IAS च्या हत्येतील दोषी आनंद मोहन सिंह हा मागील 15 वर्षांपासून तुरुंगात आहे आणि आता त्याची सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच, नितीश कुमार यांच्या सरकारने कारागृहातील कैद्यांच्या सुटकेच्या नियमांमध्ये बदल केले आणि कर्तव्यावर असलेल्या सार्वजनिक सेवकांच्या हत्येसाठी दोषी ठरलेल्यांना तुरुंगवासाची शिक्षा माफ करण्यास मंजुरी दिली. राज्य सरकारने नवीन नियमांनुसार 27 कैद्यांची सुटका करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या प्रकरणावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी या निर्णयावर टीका केली आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने हा बदल "दलितविरोधी" असल्याचे म्हटले आणि नितीश कुमार सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
आपल्या मुलाच्या लग्नासाठी 15 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर असलेला आनंद मोहन सिंह यानेही भाजपवर टीकास्त्र सोडले. "गुजरातमध्ये बिल्किस बानो प्रकरणातील काही दोषींची सुटका झाली आहे. तेही नितीश-आरजेडीच्या दबावामुळेच का?" असा मिश्कील सवाल यावेळी आनंद मोहन सिंहने केला.
संबंधित बातम्या: