Covaxin : कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या लसी गुणवत्तापूर्ण नव्हत्या, त्यामुळे तुटवडा; लसीकरण सल्लागार गटाच्या अध्यक्षांचा खुलासा
सुरुवातीच्या काही बॅच गुणवत्तापूर्ण नव्हत्या त्यामुळे देशात कोवॅक्सिन या कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता असं नॅशनल वॅक्सिन अॅडव्हायजरी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्ली : भारत हा लस निर्मितीमध्ये जगातील अग्रेसर देश आहे. तरीही देशात कोरोनाच्या लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यातही कोवॅक्सिन लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला होता. कोवॅक्सिन या लसीच्या सुरुवातीच्या काही बॅचेस या गुणवत्तापूर्ण नव्हत्या, त्यामुळे या लसीचे उत्पादन थांबवण्यात आलं होतं असा खुलासा नॅशनल वॅक्सिन अॅडव्हायजरी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी केला आहे.
कोवॅक्सिन या लसीची निर्मिती हैदराबादच्या भारत बायोटेककडून करण्यात येते. सुरुवातीच्या काही बॅच या गुणवत्तापूर्ण आढळल्या नाहीत. त्यामुळे या लसीची निर्मिती थांबवली होती. नंतरच्या बॅचमध्ये गुणवत्ता आढळली आणि मग याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले असं नॅशनल वॅक्सिन अॅडव्हायजरी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलं. कोवॅक्सिनच्या लसीचा तुटवडा का निर्माण झाला होता असा प्रश्न विचारल्यानंतर डॉ. एनके अरोरा यांनी हा खुलासा केला.
Breaking: the head of the Govt’s vaccine advisory panel Dr NK Arora tells me initial batches of Covaxin ‘were not of the right quality’. @OnReality_Check
— Sreenivasan Jain (@SreenivasanJain) August 2, 2021
सुरुवातीच्या ज्या बॅच गुणवत्तापूर्ण नव्हत्या त्यांचा लसीकरणासाठी वापर करण्यात आला नसल्याचंही डॉ. एनके अरोरा यांनी स्पष्ट केलं.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना विरोधात 77.4 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच डेल्टा व्हेरिएंटविरोधात ही लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील संक्रमणाविरोधात ही लस 93.4 टक्के प्रभावी असल्याच स्पष्ट झालं आहे. असिम्टोमॅटिक प्रकारात ही लस 63 टक्के प्रभावी आहे. कंपनीने आपल्या तिसऱ्या फेजच्या चाचणीमध्ये 18 ते 98 वर्षे वयोगटातील 25,800 स्वयंसेवकांना सामिल करुन घेतलं होतं. देशभरातील 25 ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली आहे.
हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन ही भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून या आधीच स्पष्ट झालं होतं.
अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातूनही कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :