(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railways: केवळ 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा; रेल्वे लवकरच राबवणार नवी योजना
IRCTC Economy Meals: रेल्वेनं नवीन योजना सुरू करण्याचं नियोजन केलं आहे. लवकरच रेल्वे स्थानकांवर फक्त 20 रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. यासोबतच डोसा, पावभाजी आणि छोले भटुरे यांचाही आस्वाद घेता येईल.
Indian Railways IRCTC Meal: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आता रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात पोटभर जेवण दिलं जाणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ही नवी योजना सुरू करण्याचा रेल्वेचा मानस असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्याआधी काही ठिकाणी केवळ चाचणी म्हणून ही योजना राबावण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे.
भारतीय रेल्वे (Indian Railways) स्टॉल्सच्या माध्यमातून प्रवाशांना स्वस्त जेवण उपलब्ध करून देईल. हा स्टॉल जनरल डब्यासमोर बसवण्यात येणार असून, त्यामुळे रेल्वे एखाद्या स्थानकावर थांबल्यानंतर जेवणासाठी फार दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर जनरल डब्बे ज्या ठिकाणी थांबणार त्याच ठिकाणी हे स्टॉल्स उभारले जातील. प्रवाशांना रेल्वेतून उतरुन फारसं लांब जावं लागू नये अशीच व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, सर्वात आधी चाचणी म्हणूनच ही योजना राबवली जाणार आहे.
फक्त 20 रुपयात जेवण
जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्यापिण्याबाबत समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं अनेकदा दिसून येतं. वस्तू सहज उपलब्ध न झाल्यामुळे प्रवाशांना चांगल्या दर्जाचं जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वस्त दरांत जेवण आणि पाणी उपलब्ध करून देण्याची योजना रेल्वेनं आखली आहे. प्रवाशांना फक्त 20 रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. 20 रुपयांमध्ये प्रवाशांना 'इकोनॉमी फूड' मिळेल, ज्यामध्ये सात पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि लोणचं या पदार्थांचा समावेश असेल, अशी माहिती मिळत आहे.
50 रुपयांत अल्पोपहार
रेल्वेकडून सुरू केल्या जाणाऱ्या या स्टॉलवर केवळ पुरीच नाही तर राजमा चावल, मसाला डोसा, कुल्चे यांसारखे पदार्थही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राजमा चावल किंवा छोले चावल, खिचडी, कुल्चे, छोले-भटुरे, पावभाजी आणि मसाला डोसा यांसारखे स्नॅक्स केवळ 50 रुपयांमध्ये प्रवाशांना उपलब्ध करुन दिले जातील. 350 ग्रॅमपर्यंत यापैकी कोणतीही वस्तू 50 रुपयांना घेता येईल, अशी माहिती मिळत आहे. रेल्वेनं आयआरसीटीसी झोनला प्रवाशांना पॅकबंद पाणी पुरवण्याचे निर्देशही दिले आहेत.
64 स्थानकांवर स्वस्त जेवण
स्वस्त दरांत जेवण उपलब्ध करुन देण्याची योजना सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेनं 64 रेल्वे स्थानकांची निवड केली आहे. सर्वात आधी या 64 रेल्वे स्थानकांवर सहा महिन्यांसाठी ही सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर ही सेवा इतर रेल्वे स्थानकांवर सुरू केली जाईल. पूर्व विभागातील 29 स्थानकं, उत्तर विभागातील 10 स्थानकं, दक्षिण मध्य विभागातील 3 स्थानकं, दक्षिण विभागातील 9 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे, जिथे स्वस्त जेवण मिळेल.