(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2022 : फाळणीच्या निर्वासितांसाठी वसवलं होतं शहर, कोण होत्या कमलादेवी चट्टोपाध्याय?
Independence Day 2022 : कमलादेवी यांनी लोकांच्या सहभागातून इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनच्या मार्फत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचं दिल्लीजवळ पुर्नवसन केलं.
Independence Day 2022 : कमलादेवी चट्टोपाध्याय (kamaladevi chattopadhyay) या एक स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज भारतात अनेक सांस्कृतिक संस्था अस्तित्वात आहेत, ज्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि क्राफ्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी भारतीय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. त्यासाठी त्यांना स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही सत्ताकेंद्रांचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. कमलादेवी यांनी भारताची फाळणी झाल्यानंतर निर्वासितांसाठी एक शहर वसवलं होतं.
कमलादेवी यांचा सहकार चळवळीवर खूप विश्वास होता. त्यामुळे त्यांनी निर्वासितांसाठी युनियनची स्थापना करण्याचे ठरवले आणि त्यानुसार इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनची स्थापना केली. कमलादेवी यांनी लोकांच्या सहभागातून निर्वासितांसाठी एक शहर वसवण्याचा विचार केला. त्याबाबत त्यांनी एक प्लॅन देखील तयार केला. परंतु, या प्लॅनला देशाच्या पंतप्रधानांच्या मंजूरीची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी तो प्लॅन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांच्यासमोर ठेवला. जवाहरलाल नेहरूंनी हा प्लॅन स्वीकारला परंतु, या शहरासाठी सरकार कोणतीही आर्थिक मदत करणार नाही अशी अट ठेवली. कमलादेवींनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनच्या मार्फत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचं दिल्लीजवळ पुर्नवसन केलं. या जागेला आज फरिदाबाद म्हणून ओळखलं जातं.
कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी एका सारस्वत कुटुंबात झाला. त्यांचे वडील मंगळुरूचे जिल्हाधिकारी होते, तर त्यांची आई कर्नाटकातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील होती. प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने त्यांना महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले आणि ऍनी बेझंट यांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आणि विचारवंतांना भेटण्याची भरपूर संधी मिळाली. हे सर्व जण त्यांच्या आईवडिलांचे मित्र म्हणून त्यांच्या घरी वारंवार येत असत. या सर्वांचा कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यावर खूप प्रभाव होता, ज्या स्वदेशी मिशन ऑफ नेशन्सच्या सुरुवातीच्या समर्थक बनल्या.
वयाच्या 14 व्या वर्षी कमलादेवी यांचा विवाह कृष्ण राव यांच्याशी झाला. परंतु, विवाहाच्या दोन वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. पहिल्या पतीच्या निधनानंतर कमलादेवी यांचे दुसरे लग्न 1920 मध्ये महान कवयित्री सरोजिनी नायडू यांचे कवी-नाटककार बंधू हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी झाले. यानंतर त्यांनी दोन मूकपटांमध्येही काम केले. नंतर त्या पतीसोबत लंडनला गेल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी असहकार चळवळीत भाग घेण्यासाठी हे जोडपे 1923 मध्ये भारतात परतले. त्यानंतर कमलादेवी दलितांच्या सामाजिक उन्नतीसाठी काम करण्यासाठी स्थापन केलेल्या सेवा दलात सामील झाल्या.
कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी 1926 मध्ये मद्रास प्रांतीय विधानसभेच्या एका जागेसाठी निवडणूक लढवली, परंतु, केवळ 200 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1936 मध्ये त्यांची काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांना जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि मीनू मसानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
कमला देवी यांनी अनेक युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. अनेक सामाजिक सुधारणा व समुदाय कल्याण कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणि महिलांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी आणि चालविण्यास प्रेरित केले. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे 29 ऑक्टोबर 1988 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.