(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona vaccine : लसीचा तुटवडा लवकरच दूर होणार, डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस उपलब्ध होणार
देशातील लसीचा तुटवडा लवकर दूर होण्याची शक्यता आहे. कारण ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात आठ प्रकारच्या लसींचे 216 कोटी डोस भारतात उपलब्ध होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यात लसीकरण थंबवण्यात आलं आहे, तर काही ठिकाणी लसीकरण मंदावली आहे. अनेक राज्ये ग्लोबल टेंडर काढण्याच्या तयारीत आहेत. याचद रम्यान एक दिलासादायक बातमी आहे. पाच महिन्याच्या आत लसीचा तुटवडा दूर होईलच पण देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त, 216 कोटी डोस उपलब्ध होतील, असा दावा सरकारने केला आहे.
देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्येच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलं. लसीचा अभाव असल्याचा दावा करुन अनेक राज्ये केंद्र सरकारकडे पुरवठा वाढवण्याची मागणी करत आहेत. परंतु येत्या काही महिन्यात लसीच्या तुटवड्यावर तोडगा निघेल, असं सरकारने म्हटलं आहे. कोरोना लसीबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
दिल्लीत गुरुवारी (13 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी सांगितलं की, आगामी ऑगस्टपासून डिसेंबर म्हणजेच पाच महिन्याच्या आत देशाकडे लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध असतील. देशात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत लसीची उपलब्धता पाहता एकूण 216 कोटी लसीचे डोस असतील, अशी आशा आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, 216 कोटी लसींच्या डोसमध्ये 55 कोटी कोवॅक्सिनचे डोस, 75 कोटी कोविशील्ड, 30 कोटी बायो ई सब युनिट लस, 5 कोटी झायडस कॅडिला डीएनए, 20 कोटी नोवावॅक्सिन, 10 कोटी भारत बायोटेकची नेझल वॅक्सिन, 6 कोटी जिनोवा आणि 15 कोटी स्फुटनिक लसीचा समावेश असेल. याशिवाय इतर परदेशी लसीही येऊ शकतात.
देशात 18 वर्षे आणि त्यावरील जास्त वयोगटाची लोकसंख्या 95 कोटी आहे. सगळ्यांचे दोन्ही दोन मिळून सुमारे दोन अब्ज डोसची आवश्यकता असेल. अशातच विरोधक सातत्याने दुसऱ्या कंपन्यांना परवाना देण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, ज्यावर सरकार काम करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसीची तुटवडा आहे. दिल्लीतील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आले आहेत. मुंबईसारख्या शहरातही अशीच परिस्थिती आहे. लसीवरुन राजकारण सुरु असतानाच एक दिलासादायक बाब म्हणजे रशियाची स्फुटनिक ही लस लवकर बाजारात उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यात ही लस बाजारात येईल आणि जुलै महिन्यापासून भारतात या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल.