पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? 'या' राज्यात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील काही भागांमध्ये थंडीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कुठं पावसाची शक्यता आहे.
Weather News : भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील काही भागांमध्ये थंडीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागात दाट धुके कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच आज विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर 8 आणि 9 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी हलका्या पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारताच्या मैदानी भागात हलका पाऊस पडेल.
अनेक ठिकाणी पडणार धुके
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 जानेवारी दरम्यान उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि तमिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा-चंडीगड, पूर्व राजस्थानच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान, पूर्व उत्तर प्रदेशातील विविध भागात सकाळी काही तासांसाठी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर 6 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा; हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये धुके कायम राहील. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये आज आणि उद्या सौम्य थंडीची लाट राहणार आहे. पूर्व आणि पश्चिम राजस्थानच्या अनेक भागांमध्ये सौम्य ते तीव्र थंडीची लाट कायम राहू शकते.
या भागात पावसातची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीपमध्ये 7 जानेवारीपर्यंत पाऊस पडू शकतो. तर तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं ढगाळ वातावरण आहे तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील पडत आहे. सध्याच्या वातावरणीय बदलानुसार 7 जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: